२०२२ पर्यंत भारताचा सुपुत्र किंवा सुपुत्री अंतराळात जाईल. त्याच्या किंवा तिच्या हाती आपला तिरंगा असेल आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज अभिमानाने अंतराळात फडकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. आपल्या भाषणात त्यांनी मागील साडेचार वर्षात झालेला विकास, जगामध्ये भारताची प्रतिमा कशी बदलली यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले.

२०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल. भारतीय वैज्ञानिक यादृष्टीने पावले टाकत आहेत. इस्त्रोमध्येही यादृष्टीने वेगाने काम सुरू आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिका या तीन देशांनीच अंतराळात माणूस पाठवला आहे पण या यादीत आता भारताचेही नाव जोडले जाईल. इस्त्रोने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अंतराळ मोहिमा हाती घेतल्या आहे.अनेक उपग्रहही अंतराळात पाठवले आहेत. लवकरच भारत अंतराळात माणूस पाठवेल यात मला काहीही शंका वाटत नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.