पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा भारतीय दूतावासाची मदत (कॉन्स्युलर एक्सिस) मिळवून देण्यास नकार दिल्यानंतर आता भारताने यावरची भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी याबाबत सांगितले की, आम्ही ‘आयसीजे’च्या निर्णयाचे पूर्णपणे पालन होईल यासाठी कायम प्रयत्नात राहू, यासाठी आम्हाला मुत्सद्दीपणे पाकिस्तानच्या संपर्कात राहायला आवडेल .

या अगोदर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ मोहम्मद फैसल यांनी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा भारतीय दूतावासाची मदत दिली जाणार नसल्याचे सांगितले होते.

यावेळी जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबत बोलताना रवीश कुमार यांनी सांगितले की, राज्यातील ९२ टक्के क्षेत्रात आता कोणतेही प्रतिबंध नाहीत. याबरोबरच जम्मू-काश्मीरमध्ये औषधांचाही तुटवडा नसल्याचे सांगत, येथील बँकींग सेवा देखील सुरूळीत असल्याचे त्यांनी म्हटले.

आयसीजेच्या निर्णयानंतर नरमलेल्या पाकिस्तानने या अगोदर कुलभूषण जाधव यांना एकदा भारतीय दुतावासाची मदत देण्यास संमती दिली होती. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. तीन वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र पाकिस्तान यासाठी तयार होत नव्हता. मात्र, आयसीजेच्या निर्णयानंतर या अगोदर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देणार असल्याची माहिती ट्विटवरून दिली होती.