नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी उठल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर ममता बॅनर्जी भर कार्यक्रमात भडकल्या. कार्यक्रमात करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरून तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनीही संताप व्यक्त केला आहे.

कोलकात्ता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ममता बॅनर्जी कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी म्हणून मंचावर आल्या, तेव्हा उपस्थितांच्या गर्दीमधून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जींनी आपली नाराजी प्रगट केली व भाषण करण्यास नकार दिला.

‘रामाचं नाव गळयात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही’ असे नुसरत जहाँ यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनाच्या निमित्ताने आयोजित सरकारी कार्यक्रमात राजकीय आणि धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली, त्याचा मी निषेध करते” असे नुसरत जहाँ यांनी म्हटले आहे.

दरम्यान नुरसत जहाँ या नेहमीच सामाजिक विषयांवर सोशल मीडियामधून भूमिका मांडत असतात. सध्या त्या त्यांच्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. दोनवर्षांवर्षी त्यांचे लग्न झाले होते. पण सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. एक सहकलाकारासोबत त्यांचे नाव जोडले जात आहे.