पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांचा शपथविधी होत आहे. या मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांच्या यादीत पहिला मान हा महाराष्ट्राला नारायण राणे यांच्या रुपाने मिळाला.नारायण राणे यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. तर, त्यांच्या शपथविधी होताच त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देताना, काँग्रेसवर निशाणा साधला. “जे काँग्रेसला १२ वर्ष समजलं नाही, ते भाजपाच्या नेतृत्वाला कळलं की नारायण राणेंची किंमत काय आहे, त्यांचं वजन काय आहे, त्यांचा अभ्यास व अनुभव काय आहे.” असं आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.

माध्यांना प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी सांगितलं की, “नारायण राणे यांची प्रशासनावर असलेली पकड, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा त्यांचा असलेला अभ्यास आणि आज देशाचे एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. एक कार्यकर्ता म्हणून मला एवढा विश्वास आहे की भाजपाला पुढील प्रत्येक निवडणुकीत एक नंबरचा पक्ष बनवण्याच्या दृष्टीने नारायण राणे निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करतील, मेहनत करतील. कारण, आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आणि अनुभवानुसार नारायण राणे पहिल्या दोन-तीन क्रमांकात आहेत. म्हणून याचा फायदा हा भाजपा संघटन म्हणून आम्हाला निश्चतपणे होईल. कोकण असो महाराष्ट्र असो जिथे जिथे आज भाजपा वाढवण्याची गरज आहे. तिथे आजचा दिवस हा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी महत्वाचा आहे.”

नारायण राणेंच्या शपथविधीनंतर राणे बंधूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, “नारायण राणे यांच्या कमबॅकचं श्रेय मी भाजपाच्या नेतृत्वाला देईन. जे काँग्रेसला १२ वर्ष समजलं नाही, ते भाजपाच्या नेतृत्वाला कळलं की नारायण राणेंची किंमत काय आहे, त्यांचं वजन काय आहे, त्यांचा अभ्यास व अनुभव काय आहे. काँग्रेसने वारंवार नारायण राणेंना शब्द देऊन देखील तो पूर्ण केला नाही. पण अवघ्या दीड वर्षात भाजपाने मला आमदारा केलं. माझ्या मोठ्या भावाला आज प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. नाराण राणे यांना आज केंद्रीयमंत्री पद दिलेलं आहे. कार्यकर्त्याची जाण असणारा पक्ष म्हणून भाजपाची जी ओळख आहे, त्यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे, असं मी म्हणेन. याचा फायदा भविष्यात भाजपासाठी कसा करता येईल, यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे मेहनत करणार आहोत.” असं देखील नितेश राणेंनी यावेळी बोलून दाखवलं.

तर, “सर्वात प्रथम राणे कुटुंबीयांच्यावतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राणे कुटुंबीयांच्यावतीने मी मनापासून आभार मानतो. आज राणे कुटुंबीयांसाठी सुवर्णक्षण निश्चितपणे आहे, पण त्याच बरोबर एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांसाठी देखील महत्वाचा क्षण आहे, हे मला या निमित्त सांगायचं आहे.” अशा शब्दांमध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.