काँग्रेसचे आमदार अमीन खान सोमवारी राजस्थान विधानसभेतील चर्चेदरम्यान गायीचा उल्लेख करताना भावूक झाले. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती. त्यावेळी खान यांनी मतांच्या राजकारणासाठी भाजपाने गायींचा वापर केल्याचा आरोप केला. एक गाय माझ्या अत्यंत जवळची होती. प्रेमाने रोज ती माझ्याजवळ यायची. आता ती गाय नाही. पण आजही जेव्हा तिचा चेहरा मला आठवतो, तेव्हा मी खूप भावूक होतो. विधानसभेत याचा उल्लेख करताना मला अश्रू अनावर झाले, असे त्यांनी सांगितले. पाचवेळा आमदार झालेले खान यांनी आपला डेअरीचा व्यवसाय असून आपण गायींचा सांभाळ केल्याचे सांगितले.

अमीन खान हे बाडमेर जिल्ह्यातील शीव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते २०१३ मध्ये पराभूत झाले होते. यावेळी ते विजयी झाले. गतवेळी गेहलोत सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

गेल्या काही वर्षांत गायींवरून देशभरात मोठा वाद होत आहे. गो तस्करीच्या संशयावरून समूहाकडून अनेक लोकांवर हल्ले झाले आहेत. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे एखाद्या गायीचा अचानक मृत्यू झाला तर तिच्यावर योग्य पद्धतीने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे भोपाळचे महापौर आलोक शर्मा यांनी जाहीर केले होते. ही स्मशानभूमी गायींसाठीच असेल, असेही त्यांनी सांगितले. गायींसाठी स्मशानभूमी असेलेले भोपाळ हे देशातील पहिले शहर असेल.