भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. पुढील निवडणुकीत भाजपा सत्तेवर येईल आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त करत टीडीपीला रालोआचे दरवाजे बंद झाल्याचे म्हटले. नायडू यांनी त्वरीत शाह यांच्यावर पलटवार केला आहे. शाह यांच्या वक्तव्यातून त्यांचा अहंकार दिसून येतो. रालोआचे दरवाजे उघडा असे त्यांना कोण म्हणाले होते, शाह यांचे हे वक्तव्य अत्यंत निंदनीय असून ते अशा पद्धतीचे वक्तव्य का करत आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.

अमित शाह यांनी एन चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी रालोआचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केल्याचे सोमवारी म्हटले होते. रालोआ पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि मोदी हे पुन्हा पंतप्रधान बनतील. त्यावेळी टीडीपी प्रमुख पुन्हा एकदा रालोआत येण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्यासाठी सर्व दरवाजे बंद झाले आहेत, असे शाह यांनी श्रीकाकुलम जिल्ह्यातील पालासा शहरात म्हटले होते. आम्ही आंध्र प्रदेश आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करू इच्छितो की, आम्ही नायडूंसाठी रालोआचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले आहेत.

नायडू यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. सत्ता भोगण्यासाठी ते एन टी रामाराव यांच्या टीडीपीत सहभागी झाले. संधी मिळताच त्यांनी एनटीआर यांना धोका दिला आणि सत्ता तसेच संपूर्ण पक्षावर वर्चस्व मिळवले, अशा शब्दांत शाह यांनी नायडूंवर निशाणा साधला.

शाह म्हणाले, चंद्राबाबू १० वर्षे भटकत होते. स्वत:च्या जीवावर सत्ता मिळू शकत नाही, याची जेव्हा त्यांना जाणीव झाली. तेव्हा त्यांनी मोदीजी आणि रालोआशी हातमिळवणी केली. आता त्यांनी रालोआला सोडले आहे आणि मोदींविरोधात आरोप करत आहेत. त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून तेलुगू लोकांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.