करोनाची लस ज्यावेळी बाजारात येईल त्यावेळी ती सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी कोणाकडूनही पैसे घेतले जाऊ नयेत, अशी भूमिका इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मांडली आहे. तसेच यापुढे ‘वर्क फ्रॉम होम’ चालू ठेवण्यासही त्यांनी विरोध दर्शवला. घरुन काम करण्याची सुविधा हा कायम स्वरुपाचा पर्याय नाही, असंही मूर्ती यांनी म्हटलं आहे.
नारायण मूर्ती म्हणाले, “मला मान्य आहे की करोनाची लस ही सार्वजनिक असावी. तसेच प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत मिळावी. त्यासाठी लस बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना संयुक्त राष्ट्रांकडून निधी मिळायला हवा.”
दरम्यान, कायम स्वरुपी घरुनच काम करण्याच्या अर्थात ‘वर्क फ्रॉम होम’च्या सुविधेवर नारायण मूर्ती यांनी असहमती दर्शवली. त्यांनी म्हटलं, “भारतात बहुतेक लोकांची घरं छोटी आहेत. ज्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते.” त्याचबरोबर थोड्या-थोड्या कालावधीसाठी शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. यासाठी पीपीई कीट, फिजिकल डिस्टंसिंग, मास्क आणि ग्वोव्ह्ज यांसह अन्य सुरक्षा नियमांचं पालन होण गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भारतातील सर्व जनतेला लस देण्यासाठी सरकारला सुमारे तीन अब्ज डोस तयार करावे लागणार आहेत. करोनाच्या दररोजच्या आकडेवारीत आज पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३८,६१७ नवी प्रकरणं समोर आल्याने एकूण बाधितांची संख्या ८९ लाखांच्यापार पोहोचली आहे. मंगळवारी २९,१६४ प्रकरणांची नोंद झाली आहे. बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ती आता ८३ लाख झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 6:26 pm