19 December 2018

News Flash

जेटली गुजरातवर भार, जनतेला राजीनामा मागण्याचा अधिकार: यशवंत सिन्हा

नोटाबंदीवरून त्यांनी मोदींची तुलना मोहम्मद बिन तुघलकशी केली.

Yashwant Sinha: भाजपचे दिग्गज नेते आणि अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

भाजपचे दिग्गज नेते आणि अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर निशाणा साधला असून जीएसटीमध्ये अनेक त्रुटी असल्याची टीका करत अरूण जेटली हे गुजरातच्या लोकांवर भार आहेत. त्यामुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला जबाबदार धरून जनतेला त्यांचा राजीनामा मागण्याचा हक्क असून त्यांनी आपले पद सोडले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे जेटली हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान, सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवरही टीकास्त्र डागले. नोटाबंदीवरून त्यांनी मोदींची तुलना मोहम्मद बिन तुघलकशी केली. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे ३.७५ लाख कोटींचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘लोकशाही बचाओ’ आंदोलनाशी निगडीत कार्यकर्त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रभाव आणि अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती यावर सिन्हा यांच्या व्याख्यानाचे गुजरातमध्ये आयोजन केले होते. वारंवार मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करणाऱ्या यशवंत सिन्हांनी माध्यमांशी संवात साधताना पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले. सरकारने कोणत्याही परिणामांचा विचार न करता जीएसटी लागू केला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एकामागोमाग दोन धक्के बसले.

आमचे अर्थमंत्री गुजरातचे नाहीत तरीही त्यांना येथून राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. ते गुजरातच्या जनतेवर ओझं आहेत. जर त्यांना येथून निवडून दिलं नसतं तर एका गुजरातीला संधी मिळाली असती, असे म्हणत अर्थमंत्री एका व्यवस्थेवर विश्वास ठेवतात, चितही माझेच आणि पटही माझेच, असंच त्यांचं म्हणणं असतं असा टोलाही लगावला.

जीएसटीचे दर निश्चित करताना योग्य पद्धतीने ते केले असते तर अशा विसंगती आणि अराजकतेपासून आपण वाचलो असतो. देशात दोषपूर्ण कर प्रणाली लागू करण्याचे श्रेय ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे देशातील जनतेला त्यांचा राजीनामा मागण्याचा पूर्ण हक्क आहे, त्यांनीही हे पद सोडले पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान, सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना १४ व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकशी केली. तुघलकनेही ७०० वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक राजे-महाराजे यांनी आपली मुद्रा आणली. काहींनी नवे चलन आणण्याबरोबर आधीच्या मुद्रांचे चलन कायम ठेवले होते. पण ७०० वर्षांपूर्वी मोहम्मद बिन तुघलक होता, ज्याने नवीन मुद्रा आणली आणि जुन्या मुद्रा संपुष्टात आणण्याची घोषणा केली, असे ते म्हणाले.

First Published on November 15, 2017 9:07 am

Web Title: yashwant sinha criticized on fm arun jaitley pm narendra modi notabandi gst gujrat
टॅग Gst,Yashwant Sinha