‘गुजरातच्या जनतेने या निवडणुकीत दोन चांगली कामे केली, एक म्हणजे त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना तोंड उघडायला भाग पाडले आणि दुसरे म्हणजे त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यास शिकवले,’ अशा शेलक्या शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. गुजरातच्या बनासकांठा येथे टोटाना आश्रमाला भेट दिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.


गुजरातचा प्रचार दौरा सुरु झाल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरातच्या विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. यावरुन भाजपने राहुल गांधींवर अनेकदा टीका केली. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांनी राहुल यांच्या या कृतीला निवडणूकीतील स्टंट असल्याचे म्हटले होते. तसेच राहुल गांधी अद्याप दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात कसे गेले नाहीत, असा सवालही केला होता.


दरम्यान, पाकिस्तानशी काँग्रेसचा संबंध जोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार करताना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले होते की, जे विनानिमंत्रण पाकिस्तानला जातात त्यांनी आम्हाला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत.

मनमोहनसिंग यांनी यापूर्वी मोदी सरकारने घेतलेल्या ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटी’च्या निर्णयावर टीका केली होती. मोदी सरकारचे हे फसलेले प्रयोग असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल असा इशाराही त्यांनी दिला होता. मनमोहनसिंग यांच्या या कडव्या टीकांवरुन आज योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.