MP Cough Syrup News : राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे १० मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कफ सिरपच्या धोक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल नऊ मुलांचा किडनी फेल्युअरमुळे मृत्यू झाला. तसेच राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातही एक अशीच घटना समोर आली. या मृत्यूंच्यामागे ‘कफ सिरपचा वापर’ संभाव्य कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

दरम्यान, कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या संशयाच्या प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छिंदवाडा येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली असल्याची माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. प्रवीण सोनी असं या डॉक्टरचं नाव असून या घटनेतील बहुतेक मुलांवर त्याच्या क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते असा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

सोनी हे एक सरकारी डॉक्टर आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या खासगी क्लिनिकमध्ये येणाऱ्या लहान मुलांना हे सिरप लिहून दिलं होतं असं सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने वृत्तात म्हटलं आहे. या बरोबरच मध्य प्रदेश सरकारने तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातील संबंधित कफ सिरप बनवणाऱ्या फार्मास्युटिकल्स कंपनीविरुद्धही गुन्हा दाखल केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूने काय निर्णय घेतला?

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील १० मुलांच्या मृत्यूशी संबंधित गोळा केलेल्या काही नमुन्यांमध्ये तत्सम घातक रसायनं आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने शनिवारी कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वितरणावर तात्पुरती बंदी घातली आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारने तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना औषध बनवणाऱ्या औषध कंपनीची चौकशी करण्याची विनंती केली. त्यानंतर तामिळनाडू सरकारनेही अशाच प्रकारची कारवाई केली.

कफ सिरपमुळे काही लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीनंतर केरळ सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी सांगितलं की, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अहवालात कफ सिरपबाबत सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर केरळने कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री आणि वितरण स्थगित केलं आहे. औषध नियंत्रण विभागाने खबरदारी म्हणून वितरक आणि संबंधित फार्मसींना विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत असं आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हटलं आहे.