1800-Year-Old Inscription discover: भारताच्या पुरातन इतिहासात दर वेळेस नवे दालन उघडणारे शोध समोर येत असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा पुरातत्त्वीय शोध अलीकडेच तेलंगणामध्ये लागला आहे. सातवाहन राजांच्या काळातील, तब्बल १८०० वर्षांपूर्वीचा शिलालेख तेलंगणाच्या यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यात सापडला आहे.
ब्राह्मी लिपीतील आणि प्राकृत भाषेतील या शिलालेखामुळे सातवाहन काळातील बौद्ध परंपरेचा आणि त्या काळातील लोककल्याणाच्या तत्त्वज्ञानाचा अनमोल ठसा अधोरेखित झाला आहे. या नव्या शोधामुळे तेलंगणातील बौद्ध वारसा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.
तेलंगणा राज्याच्या हेरिटेज विभागाने अलीकडेच केलेल्या उत्खननात यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील चडामध्ये इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील ब्राह्मी लिपीतील एक अपूर्ण शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख दगडी फलकावर कोरलेला असून तो प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत आहे. अशा प्रकारचे शिलालेख सातवाहन काळात प्रचलित होते.
या शिलालेखाचा काही भाग तुटलेला असला तरी त्या शिलालेखावर “सच(व)लो[क] हित सुखाय” असा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ “सर्व लोकांच्या कल्याण आणि सुखासाठी” असा होतो.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अभिलेखशास्त्र संचालक के. मुनिरत्नम रेड्डी यांच्या मते, हा शिलालेख एका विहाराला (बौद्ध विहार) अर्पण केलेल्या दगडी फलकाची नोंद आहे. यावरून या ठिकाणाचे सातवाहन काळातील बौद्ध केंद्र म्हणून असलेले महत्त्व समजते.
“तेलंगणा सरकार वारसा विभागाच्या माध्यमातून पुरातत्त्व संशोधनाला सातत्याने पाठिंबा देत आहे आणि राज्यात बौद्ध पर्यटन परिपथ विकसित करण्यासाठी सक्रिय आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक शोधामुळे तेलंगणातील बौद्ध वारसा, सातवाहन काळातील समाजरचना आणि प्राचीन काळातील लोककल्याणाची मूल्यं यांचा आणखी एक दुवा सापडला आहे. या शिलालेखाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक तथ्ये उलगडत नाहीत, तर भारतीय उपखंडातील सांस्कृतिक वैभवाची साक्षही मिळते. भविष्यात अशा आणखी शोधांमुळे आपल्या इतिहासातील अनेक अनोळखी पैलूंवर प्रकाश पडेल, हीच अपेक्षा.