राजौरी : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान शहीद झाले. चकमकीत एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. त्यात लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले असून, एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाला. जखमींना उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “पाकिटमार कधीच एकटा येत नाही..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

घटनास्थळी सैन्याची अतिरिक्त कुमक दाखल आली असून, चकमक तीव्र झाली आहे. दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा अंदाज आहे. हे दहशतवादी रविवारपासून राजौरी परिसरात फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी एका धार्मिक स्थळी आसरा घेतला होता, असेही चौकशीतून पुढे आले आहे.

बाजीमालच्या जंगलात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. जंगलालगतच्या गावातील रहिवाशांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्याचे एका रहिवाशाने सांगितले. राजौरी आणि पूंछ या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. राजौरीमध्ये १७ नोव्हेंबरला एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले होते. त्याआधी पूंछमध्ये ७ ऑगस्टला घुसखोरीचा प्रयत्न उधळून लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा महिन्यांत ४६ मृत्यू

यंदा जानेवारीपासून जम्मूच्या तीन जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी २५ दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत लष्करी अधिकाऱ्यांसह १४ जवान शहीद झाले. त्यात पाच लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांत एप्रिल-मेमध्ये झालेल्या चकमकीत १० जवानांनी प्राण गमावले. राजौरीमध्ये सर्वाधिक चकमकींची नोंद झाली आहे.