२० हजार लोक सुरक्षितस्थळी

आंध्र प्रदेशमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे वेगवेगळ्या घटनांत मृत्यू पावलेल्यांची संख्या शनिवारी किमान २० वर पोहोचली असून कडप्पा आणि चित्तोर जिल्ह्यांत  ३० जण अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. अनंतपूरमू जिल्ह्यातील कादिरी शहरात पावसात घर कोसळून किमान चार जण ठार झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता तेथे मदतकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या हानीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कडपा, अनंतपूरमू आणि चित्तोर जिल्हात हवाई पाहणी केली. अतिवृष्टीत मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.

नेल्लोर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून पेन्नार नदीला आलेल्या पुरामुळे शनिवारी अनेक गावांचा संपर्क तुटला. पूरग्रस्त भागातील हजारो लोकांना एसपीएस नेल्लार जिल्ह्यातील मदत छावण्यांत आसरा देण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या जिल्ह्यात मदतीसाठी एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती निवारण दलाची पथके पाठविण्यात आली आहेत. एकूण २० हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.

तमिळनाडूत ६८ टक्के अधिक पाऊस

चेन्नई : तमिळनाडूत सध्या सुरू असलेला ईशान्य मोसमी पाऊस हा तुलनेत ६८ टक्के जास्त असून गेल्या २४ तासांत पावसाने तीन जणांचा मृत्य झाला, तसेच ३०० हून अधिक गुरे दगावली, अशी माहिती राज्य सरकारने शनिवारी दिली.  राज्यातील मेत्तूर (सालेम) आदी प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तसेच थेनपेन्नाई आदी नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.   महसूल मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितले की, राज्यात १ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ५१८.९९ मिमी पाऊस झाला असून या कालावधीतील सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ६८ टक्के अधिक आहे.

शबरीमला यात्रा सुरळीत

पथनमथित्ता : केरळच्या पथनमथित्ता जिल्ह्याच्या अनेक भागांत शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने शबरीमला येथील भाविकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती; पण शनिवारी भाविकांचे वेगवेगळे जथे करून या पर्वतीय यात्रेस परवानगी देण्यात आली. याच दरम्यान पम्बा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

शबरीमला परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेता तसेच पम्बासह अन्य प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने पथनमथित्ता जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी आदेश जारी करून शनिवारच्या शबरीमला यात्रेवर बंदी घातली होती; परंतु शनिवारी तेथील स्थिती पूर्ववत झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी दिव्या एस. अय्यर यांनी निलाकल येथे अडकून पडलेल्या भाविकांना यात्रा परिक्रमेसाठी तसेच मंदिरात दर्शनाला टप्प्याटप्प्याने परवानगी दिली. सुधारित आदेश जारी होताच सकाळी साडेदहा वाजता यात्रा सुरू झाली.