Man Rapes 80 Year Old: चोरीच्या गुन्ह्यातून दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटलेल्या २३ वर्षीय गुन्हेगाराने दोनच दिवसात माणुसकीला काळिमा फासणारा असा गुन्हा केला. तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात सायंकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेल्या एका ८० वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार केला. शनिवारी सुटलेल्या गुन्हेगाराने दोनच दिवसांत गंभीर गुन्हा केल्यामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी आरोपीने महिलेवर अत्याचार केला, त्यावेळी तो नशेत असल्याचे सांगितले जात आहे.
पीडितेवर सध्या उपचार सुरू असून तिचे समुपदेशनही केले जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. “आम्ही या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असून आमच्याकडे भक्कम असे पुरावे आहेत. पीडिता आता धोक्याबाहेर आहे”, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी पुढे म्हटले की, आम्ही जेव्हा आरोपीची ओळख पटवून त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्याने धारधार शस्त्राने पोलिसांवरच हल्ला केला. त्यामुळे त्याच्या पायावर नाईलाजाने गोळी झाडावी लागली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या हातात चाकू होता. त्याने दोन पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यामुळे आमच्याकडे गोळी झाडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
दरम्यान तमिळनाडूमधील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते एडापड्डी पलानीस्वामी म्हणाले की, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वात राज्याची वाटचाल कुठे चालली आहे, याचे उत्तर कुणाकडेच नाही. मुख्यमंत्री राज्यातील नशेचे साम्राज्य नष्ट करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करतील, याबद्दल आता लोकांना विश्वास उरला नाही.
दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने सांगितले की, राज्यात महिलांविरोधातील गुन्हेगारी वाढलेली नाही. यासाठी द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी नुकत्याच अण्णा विद्यापीठात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाकडे बोट दाखविले. या प्रकरणी आरोपीला केवळ पाच महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.