24 Transgender Mass Suicide Attempt: मध्यप्रदेशच्या इंदूरमधील नंदलालपुरा भागात एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. याभागात राहणाऱ्या २४ ट्रान्सजेंडर व्यक्तींनी एका खोलीत फरशी पुसण्याचे औषध पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. पोलीस उपायुक्त आनंद कलाडगी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, फ्लोअर क्लीनर प्राशन केल्यानंतर सर्वांची प्रकृती खालावली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्या सर्वांना महाराज यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस उपायुक्त कलाडगी पुढे म्हणाले, नंदलालपुरा येथे ट्रान्सजेंडर राहत असलेल्या एका घरात गोंधळ उडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अज्ञात औषध प्राशन केल्याचे समजल्यानंतर तात्काळ रुग्णावाहिका बोलाविण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.

ट्रान्सजेडंर समुदायाच्या दोन गटात सुरू असलेल्या शत्रुत्वामुळे सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. तसेच या समुदायातील एका व्यक्तीवर दोन पत्रकारांनी बलात्कार करून छळ केल्याचाही आरोप होत आहे. त्याचाही स्वतंत्र तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र आत्महत्येच्या प्रयत्नासाठी कोणती घटना जबाबदार आहे, याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही.

पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, एका गटाचा नेता दुसऱ्या गटातील सदस्यांना त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. रुग्णांचा जबाब नोंदवल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल केला आहे.

छळ आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप

स्थानिक रहिवाशांनी केलेल्या दाव्यानुसार, ही घटना लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणाशी संबंधित आहे. त्यांनी आरोप केला की, दोन पुरूषांनी ते पत्रकार असल्याची बतावणी करून एका ट्रान्स व्यक्तीवर बळजबरी केली. ज्यामुळे संपूर्ण समुदायात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मात्र दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

नंदलालपुरा येथील ट्रान्सजेंडर समुदायाच्या डेऱ्याशी संबंधित नेहा कुंवर म्हणाल्या की, पत्रकार अशी ओळख सांगून दोन व्यक्तींनी एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा लैंगिक छळ केला. त्याच्याकडून पैसे उकळले आणि धमकी दिली. यासंदर्भात मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला. सदर घटना तीन महिन्यांपूर्वी घडली असून आम्ही माणसे नाहीत का? पीडितेकडून दीड लाख रुपये लुटण्यात आले, असा आरोप कुंवर यांनी केला.