भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पण हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या लहान मुलावर हल्ला केला. भररस्त्यात कुत्र्यांनी या मुलाचे लचके तोडले, रस्त्यावर मुलाला फरफटत नेले. मुलाच्या रडण्याचा आवाज येताच, त्याचे वडील धावत आले आणि कुत्र्यांच्या हल्ल्यापासून मुलाला दूर नेले. जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.

हे वाचा >> पृथ्वी शॉच्या अडचणी वाढू शकतात; जामीन मिळताच सपना गिलने दाखल केले गंभीर गुन्हे

निझामाबाद येथे राहणारे गंगाधर एका इमारतीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांचे कुटुंब याचठिकाणी राहतं. गंगाधर ज्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो, त्याच इमारतीसमोर या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या मुलावर हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण देखील समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये कुत्रे मुलावर हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. तीन कुत्रे मुलाला फरफटत नेऊन त्याचे लचके तोडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सीसीटीव्ही चित्रणानुसार हा मुलगा धाडस दाखवत या कुत्र्यांपासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र कुत्रे त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर पुन्हा हल्ला चढवतात. त्याला जमिनीवर पाडून त्याच्यावर तुटून पडतात. तीनही कुत्र्यांनी त्याचे चावे घेतले, त्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला. मुलाचा आक्रोश ऐकून त्याचे वडील गंगाधर हे धावत बाहेर येतात. परंतु तोपर्यंत कुत्र्यांनी मुलाला बरीच इजा पोहोचवली होती. या घटनेची दखल आता पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. सूरत महानगरपालिकेच्या परिसरात मागच्या १५ दिवसांत कुत्रे चावल्याच्या ४७७ घटना घडल्या आहेत. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.