देशाच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘रेसकोर्स रोड’चे बुधवारी नवी दिल्ली महानगरपालिकेकडून नामांतर करण्यात आले. ‘रेसकोर्स रोड’चे ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे निवासस्थान आता ‘७ लोककल्याण मार्ग’ या नावाने ओळखले जाईल. ‘रेसकोर्स रोड’ या नावात बदल करून ‘एकात्म मार्ग’ किंवा ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव होता. बैठकीमध्ये सर्वानुमते ‘लोककल्याण मार्ग’ या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘७ रेसकोर्स रोड’वर पंतप्रधानांच्या निवासस्थानासह अनेक प्रसिद्ध राजकीय व्यक्तींची निवासस्थाने आहेत. भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी नामबदलाचा प्रस्ताव नवी दिल्ली महानगरपालिकेकडे सादर केला होता. ‘७ रेसकोर्स रोड’ हे नाव भारतीय संस्कृतीशी जुळत नसल्यामुळे ते बदलण्याची त्यांची मागणी होती. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘७ लोककल्याण मार्ग’ या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी एकूण पाच बंगले आहेत. हा संपूर्ण परिसर १२ एकरांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये १, ३, ५, ७ आणि ९ अशा क्रमांकाचे बंगले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कुठल्या बंगल्यात राहतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ५ क्रमांकाच्या बंगल्यामध्ये वास्तव्याला आहेत. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांनी या बंगल्यात राहण्याला पसंती दिली होती. त्यामुळे या बंगल्यामध्ये छोटी पूजा केल्यानंतर त्यांनी येथे राहण्यास सुरुवात केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या क्रमांकाच्या बंगल्याचा वापर अधिकृत कार्यालय म्हणून करत होते.

या परिसरातील इतर बंगल्यांचा वापर कशासाठी केला जातो?

बंगला क्रमांक एकचा वापर हा सर्वसाधारणपणे हेलिपॅडच्या स्वरुपात केला जातो. तर सात क्रमांकाच्या बंगल्याचा वापर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या जवानांच्या निवासासाठी केला जातो. यापैकी एका बंगल्यामध्ये पंतप्रधानांचे कार्यालयही असून, तेथे नरेंद्र मोदी हे विविध पाहुण्यांना आणि शिष्टमंडळांना भेटत असतात.

‘७ रेसकोर्स रोड’ या ठिकाणी राहणारे पहिले पंतप्रधान कोण होते?

माजी पंतप्रधान राजीव गांधी हे ‘७ रेसकोर्स रोड’वर राहणारे पहिले पंतप्रधान होते. १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते आपल्या कुटुंबीयांसमवेत या बंगल्यामध्ये वास्तव्याला होते.

‘७ रेसकोर्स रोड’ला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान कोणी बनवले?

माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ‘७ रेसकोर्स रोड’ या बंगल्याला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित केले. त्यापूर्वीचे पंतप्रधान हे संसदेकडून दिल्या जाणाऱ्या बंगल्यांमध्ये राहात असत. इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना १, सफदरजंग रोड या निवासस्थानी राहात होत्या.

पंतप्रधानांचे कार्यालय (पीएमओ) कुठे आहे?

पंतप्रधानांचे अधिकृत कार्यालय ज्याला पीएमओ असेही म्हणतात ते रायसीना हिल्सवरील साऊथ ब्लॉकमध्ये आहे.