नीरज राऊत
मतदार नोंदणीच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह
पालघर लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांत ७२ हजार नवीन मतदारांची नोंद झाली असून, दिवसाला सरासरी ९६४ इतके मतदार आहे. गेल्या पाच वर्षांत नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २३.५ टक्के इतके आहे. सर्व नवीन मतदारांची पडताळणी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी होणे आवश्यक असताना या मतदारसंघातील ग्रामीण भागात इतक्या जलदगतीने मतदार नोंदणी कशी झाली याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने गेल्या वर्षी मेमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी पालघरमध्ये १७ लाख ३१ हजार मतदारांची नोंद झाली होती. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१९ या निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुदतीत पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे १८ लाख १३ हजार मतदारांची नोंदणी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (९ एप्रिल) मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू होता. २९ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीसाठी अंतिमत: १८ लाख ८५ हजार मतदार नोंदणी झाल्याची माहिती पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीपासूनच्या वर्षभराच्या कालावधीत पालघरमध्ये १ लाख ५४ हजार नव्याने मतदारांची नोंद झाली असून साप्ताहिक सुट्टय़ा व इतर सुट्टय़ांचा विचार करता वर्षांला सुमारे २६० दिवस शासकीय कामकाज झाले.
१ जानेवारी ते ९ एप्रिल या ७५ दिवसांच्या कामकाजाच्या कालावधीत पालघरमध्ये ७२ हजार मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. हा वेग लक्षात घेता दिवसाला सुमारे ९५० ते एक हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली. यामध्ये नालासोपारा व बोईसर येथे दररोज सरासरी सुमारे ३००, तर वसईत दररोज १५० नवमतदारांची नोंदणी झाली असून या सर्व नव्याने नोंदविल्या गेलेल्या मतदारांची पडताळणी व इतर कागदपत्रांची पूर्तता कशी करण्यात आली याबद्दल शंका आहे.
कंत्राटी कामगारांच्या हाती जबाबदारी
ऑनलाइन मतदार नोंदणी नॅशनल वोटर सव्र्हिस पोर्टल (एनव्हीएसपी) या संकेतस्थळावर करता येते. संकेतस्थळावर प्राप्त अर्ज केंद्रस्तरीय मतदार अधिकारी यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर त्याची माहिती घेऊन मतदारांच्या अर्जावरील माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होणे आवश्यक आहे. मात्र या संकेतस्थळावरील माहिती ‘ईआरओ नेट’ या शासकीय वापरातील सॉफ्टवेअरवर टाकण्यात आल्यानंतर पुढील सर्व प्रमुख प्रक्रिया मतदान नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात असलेल्या कंत्राटी कामगारांमार्फत हाताळली जाते.
ई – सेवा केंद्राचा गैरवापर : सर्वसामान्य नागरिकांना
सेवा पुरविणाऱ्या ई सेवा केंद्र व महा ऑनलाइन केंद्राचा ठेका घेणाऱ्या मंडळींकडे ईआरओ या नाव मतदार नोंदणीच्या कामाची जबाबदारी असल्याने नव्याने मतदाराची नोंदणी अशा ई सेवा केंद्रावर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. या नव्याने नोंदविले गेलेले मतदारांचे अर्ज कोणत्या ई सेवा केंद्रावरून भरले गेले याची तपासणी झाल्यास मतदार वाढीचा प्रकार पुढे येईल.
माहिती प्रसिद्धी कुठे? : नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्ध करून त्यावर सूचना व आक्षेप नोंदवून घेणे अपेक्षित आहे. ११ जानेवारी ते ९ एप्रिलदरम्यान पालघरमध्ये नोंदविण्यात आलेल्या ७२ हजार ३१४ मतदारांची पुरवणी यादी १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र तसे करण्यापूर्वी नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांची माहिती नेमून दिलेल्या कार्यालयात विहित नमुन्यात प्रसिद्ध करण्यात अली नसल्याचे दिसून आले आहे.