अमेरिकेत शिक्षण ते भारताचे पहिले संरक्षण प्रमुख व्हाया गोरखा बटालियन… जाणून घ्या बिपीन रावत यांच्याबद्दल

रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यान दिली.

general bipin rawat
तामिळनाडूमध्ये रावत यांच्या हेलिकॉप्टरला झाला अपघात (फाइल फोटो)

भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी बिपीन रावत हे सुखरुप असावे अशी प्रार्थना करतो अशा अर्थाचे ट्विट केले आहेत. संरक्षण प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स असणाऱ्या रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यान दिल्याची माहिती समोर आलीय. देशाचे पहिली संरक्षण प्रमुख असणारे रावत यांच्यावर उपचार सुरु आहेत. येत्या ३१ डिसेंबर रोजी बिपीन रावत यांची संरक्षण प्रमुखपदी नियुक्ती होऊन दोन वर्षे पूर्ण होतील.

बालपणीचे दिवस…
बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले.

पहिलं सन्मानपत्र
या अकादमीमधील त्यांची चमकदार कामिही पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिलं सन्मानपत्र मिळालं. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.

भारतात परतल्यानंतर लष्करी सेवेत
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना भारतीय लष्कराच्या गोरखा १ रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली. इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

अनेक पदकं…
आपल्या लष्करी सेवेदरम्यान बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Helicopter Crash : यापूर्वीही हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते बिपिन रावत; नक्की काय घडले होते जाणून घ्या…

बिपीन रावत पहिले सीडीएस
तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपिन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी सूत्रे स्वीकारली होती. जनरल रावत हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांनी संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. संरक्षणप्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वष्रे ही वयोमर्यादा असून रावत हे सध्या ६३ वर्षांचे आहेत. संरक्षणप्रमुख हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतात. २०१९ साली डिसेंबरच्या शेवटून दुसऱ्या आठवड्यात संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती.

जनरल बिपीन रावत यांनी देशाचे २६ वे लष्करप्रमुख म्हणून निवृत्ती स्वीकारल्याच्या दिवशीच संरक्षणप्रमुख ही जबाबदारी खांद्यावर घेतली. संरक्षण तज्ञांनी १९९९ पासून अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करतात. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A brief look at general bipin rawat indias first cds scsg

ताज्या बातम्या