पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा मुख्य रस्ता दहशतवाद्यांनी अडवला व एक ज्येष्ठ मंत्री आणि अनेक पर्यटकांना काही काळ ओलीस ठेवले. पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या आपल्या साथीदारांच्या सुटकेची मागणी त्यांनी केली होती, असे वृत्त आहे. शुक्रवारी समाज माध्यमांवर प्रसृत झालेल्या ध्वनिफितीत गिलगिट-बाल्टिस्तान प्रांताचे ज्येष्ठ मंत्री अबेदुल्ला बेग हे सांगत होते, की इस्लामाबादहून गिलगिटला जात असताना त्यांना आढळले, की दहशतवाद्यांनी आपल्या कारागृहात असलेल्या साथीदारांच्या सुटकेसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी रस्ता रोखला आहे.

अर्थ, उद्योग, वाणिज्य आणि कामगार मंत्रालयाचे प्रभारी मंत्री अबेदुल्ला बेग यांनी प्रसृत केलेल्या चित्रफितीत दिसते, की दहशतवाद्यांना त्यांच्या साथीदारांची सुटका झाल्याचे समजल्यावर आणि त्याला दुजोरा मिळाल्यानंतर मंत्री व पर्यटकांना सोडण्यात आले आहे. महिलांबाबत इस्लामी कायदा लागू करण्याची मागणी ‘डॉन’ वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे, की गिलगिटचा कुख्यात दहशतवादी हबीबुर रहमानच्या साथीदारांनी शुक्रवारी दुपारी चारला डायमेरमधील ठाक गावात रस्ता अडवला. त्यामुळे पर्यटक रस्त्याच्या मधोमध अडकून पडले होते. नांगा पर्वतीय प्रदेशात परदेशी पर्यटकांची निर्घृण हत्या आणि डायमेरमधील इतर दहशतवादी घटनांतील आरोपी साथीदारांच्या सुटकेची मागणी केली होती. तसेच या प्रांतात इस्लामी कायदा लागू करून महिलांना क्रीडा उपक्रमांत सहभागाची मनाई करणारा इस्लामिक कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या अथवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही.