पीटीआय, भोपाळ : एका खासगी बँकेच्या जाहिरातीमध्ये आमिर खान आणि किआरा अडवाणी यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. या जाहिरातीवरून समाजमाध्यमांमध्येही जोरदार चर्चा रंगली आहे. ‘‘तक्रारी आल्यानंतर मी ती जाहिरात बघितली. भारताची संस्कृती आणि रीतीरिवाज लक्षात घेता आमीर खानने अशा जाहिराती टाळण्याचे मी आवाहन करतो. अशामुळे काही घटकांच्या भावना दुखावत असतील, तर तसे करण्याचा त्याला काहीही अधिकार नाही’’ असे मिश्रा म्हणाले. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही जाहिरातीवर टीका केली. ‘सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्याची जबाबदारी बँकांवर कधीपासून आली? बँकांमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी या बँकेने काम करावे. असे काहीतरी करतात आणि मग हिंदू टीका करतात असे म्हणतात,’ असे ट्वीट त्यांनी केले.
जाहिरात काय?
या जाहिरातीमध्ये आमिर-किआरा हे नवदाम्पत्य विवाह करून परतत असते. पाठवणीच्या वेळी आपण दोघेही रडलो नाही, असे ते म्हणतात. घरी आल्यानंतर एरवी वधू जसा गृहप्रवेश करते, त्या पद्धतीने आमिर खान गृहप्रवेश करतो.