पीटीआय, नवी दिल्ली/बंगळूरु

‘एअर इंडिया’च्या विमानात सहप्रवासी महिलेशी घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीस दिल्ली पोलिसांनी शनिवारी बंगळूरु येथून अटक करण्यात आली. शंकर मिश्रा असे त्याचे नाव आहे.आरोपी मिश्राला अधिक चौकशीसाठी दिल्लीत आणून दिल्ली न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची विनंती न्यायालयाने फेटाळली.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी ‘एअर इंडिया’च्या न्यूयॉर्कहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानात ‘बिझनेस क्लास’मध्ये मद्यधुंद अवस्थेत ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप मिश्रावर आहे. संबंधित महिलेने ‘एअर इंडिया’कडे नोंदवलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी ४ जानेवारीला त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. पोलीस उपायुक्त (विमानतळ) रवीकुमार सिंग यांनी सांगितले, की आरोपी मिश्राला बंगळूरु येथून दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याला दिल्लीला पुढील तपासासाठी आणले आहे. तो बंगळूरु येथे आपल्या बहिणीच्या घरी लपून बसला होता. मिश्राने त्याचा फोन ३ जानेवारीपासून बंद ठेवला होता. त्याचे शेवटचे ‘ठिकाण’ बंगळूरुला असल्याचे दिल्ली पोलिसांना समजले होते.

मिश्राला शनिवारी दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. संबंधित विमानातील कर्मचारी पथकातील तीन जणांकडून आरोपीची ओळख पटवायची असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची विनंती दिल्ली महानगर न्यायदंडाधिकारी अनामिका यांनी फेटाळली. ‘‘विमानातील कर्मचारी आणि सहप्रवाशांसह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी शर्माच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. फक्त सार्वजनिक दबाव आहे म्हणून असे करू नका, कायदेशीर प्रक्रिया पाळा,’’ असे महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना सुनावले.

कोण आहे शंकर मिश्रा?
आरोपी शंकर मिश्रा (वय ३४) हा अमेरिकेची आर्थिक सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘वेल्स फर्गो’मध्ये होता. कंपनीने त्याच्यावरील गंभीर आरोपामुळे त्याला त्वरित पदमुक्त केले आहे. मिश्रा याआधी या कंपनीचा भारतातील उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) म्हणून काम करत होता. तो मुंबईचा रहिवासी आहे. तो कामगार नगरमध्ये गेल्या २० वर्षांपासून रहात आहे. येथे त्याला ‘सूरज’ म्हणून ओळखले जात होते. तो कुठल्याही अवैध प्रकारात गुंतल्याचे आम्हाला आढळले नाही. तो आपले आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहतो, असे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्या ‘लिंक्ड इन’ खात्यात त्याने ‘सूरज एम’ असे नाव दिले आहे. ‘न्यूजरूम पोस्ट’नुसार तो मुंबईतील खासगी विद्यापीठ नरसी मोनजी व्यवस्थापन संस्थेचा (एनएमआयएमएस) माजी विद्यार्थी आहे. नेहरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्यसेवा धोरणाचा फेरविचार
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी शनिवारी प्रवाशाने केलेल्या घृणास्पद कृत्याप्रकरणी माफी मागितली. कंपनी मद्यसेवा धोरणाचाही फेरविचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. एका वैमानिकासह चार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.