लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. मात्र, काही ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यास भाजपाने नकार दिला. यामध्ये भाजपा नेते वरुण गांधी यांनाही पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारले. त्यामुळे वरुण गांधी नाराज झाल्याची चर्चा आहे. वरुण गांधी सध्या पिलीभीतचे विद्यमान खासदार आहेत. भाजपाने वरुण गांधी यांचा लोकसभेचा पत्ता कट केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधी यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

अधीर रंजन चौधरी काय म्हणाले?

“वरुण गांधी यांचे काँग्रेस पक्षात कधीही स्वागत असून ते स्वच्छ प्रतिमिचे आणि कणखर, सक्षम नेते आहेत. वरुण गांधींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्हाला आंनदच होईल. वरुण गांधी यांचे गांधी कुटुंबाशी चांगले संबंध असल्यामुळे भाजपाने त्यांना तिकीट दिले नाही. वरुण गांधींनी काँग्रेसमध्ये यावे, अशी आमची इच्छा आहे”, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

वरुण गांधी काय निर्णय घेणार?

भाजपाने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधी काही वेगळा निर्णय घेणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच वरुण गांधी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अद्याप वरुण गांधी यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यासंदर्भात आणि काँग्रेस नेत्याच्या ऑफरसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आक्रमक भूमिका घेणे भोवले?

मागील १५ वर्षांपासून वरुण गांधी हे पिलीभीत मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. आता वरुण गांधी यांच्याऐवजी पिलीभीत मतदारसंघातून भाजपाने जितिन प्रसाद यांना तिकीट दिले आहे. वरुण गांधी यांनी अनेकवेळा आक्रमक भूमिका मांडली होती. तसेच शेतकरी आंदोलनाबाबतही त्यांनी काही विधाने केले होते. त्यामुळे वरुण गांधी यांना त्यांनी केलेली विधाने भोवल्याची चर्चा आहे. दरम्यान, वरुण गांधी यांच्या मातोश्री मनेका गांधी या खासदार असून त्यांना पुन्हा एकदा सुलतानपूरमधून भाजपाने तिकीट दिले आहे.