अमेरिकेतील शिकागो विमानतळावर एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे विमानतळाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात असले तरी हे प्रकरण करोनाने लोकांच्या मनात निर्माण केलेल्या भीतीचे उत्तम उदाहरण आहे. द गार्डीयनने दिलेल्या वृ्त्तानुसार भारतीय वंशाचा एक ३६ वर्षीय अमेरिकन व्यक्ती करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एवढा घाबरला की तो मागील तीन महिन्यांपासून विमानतळावर लपून राहत आहे. या व्यक्तीचे नाव आदित्य सिंह असल्याची माहिती समोर आळी आहे. आदित्यने विमानतळावरील एअरपोर्ट ऑप्रेशन्स मॅनेजरचा बॅच चोरला होता. याच बॅचचा वापर करुन तो विमानतळावरील कर्मचारी आणि प्रवाशांकडे पैसे आणि खाणं मागून विमातळावरच राहत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य शिकागो विमानतळाच्या सिक्युअर सेक्शनमध्ये लपला होता. पोलिसांनी जेव्हा आदित्याला अटक केली तेव्हा त्याने मला करोनाची लागण होईल अशी भीती वाटत असल्याने मी विमानाने प्रवास करायला घाबरत होतो. त्यामुळेच मी विमानतळावर राहत होतो. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आदित्य लॉस एंजेलिसवरुन शिकागोला आला होता. मात्र तिथून पुढचा प्रवास करायला त्याला भीती वाटू लागली. त्यामुळेच तो तब्बल तीन महिने विमानतळावरच राहत होता. आदित्यला मागील आठवड्यात विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात चोरी, फसवणूक आणि चुकीची वर्तवणूक केल्याच्या कलमांअंतर्गत खटला चालवला जात आहे. विमान कंपनीतील कर्मचाऱ्याने आदित्यकडे त्याची ओळख सांगण्यास सांगितले असता आदित्य गोंधळून गेला. आदित्यने त्याच्या कपड्यांवरील बॅचकडे इशारा केला. मात्र हा बॅच हरवल्याची तक्रार विमानतळावरील संबंधित कर्मचाऱ्याने ऑक्टोबर महिन्यातच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आदित्यला शनिवारी पोलिसांनी अटक केली.

(Aditya Singh Photo by AP)

आदित्यने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार त्याला अधिकाऱ्याचा बॅच विमानतळावर पडलेला सापडला. त्यानंतर करोना संसर्गाच्या भीतीमुळे मला विमानतळाबाहेर पडायला भीती वाटत होती त्यामुळे मी या बॅचचा वापर केला, अशी कबुली आदित्यने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य १९ ऑक्टोबर रोजी एका विमानाने लॉस एंजेलिसवरुन शिकागो विमानतळावर दाखल झाला. त्यानंतर तो तेथेच राहू लागला. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणारं अन्न आणि पैशांच्या मदतीने तो विमानतळावरच राहत होता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. “म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एक व्यक्ती बेकायदेशीरपणे १९ ऑक्टोबर २०२० पासून १६ जानेवारी २०२१ दरम्यान ओहारे विमानतळाच्या टर्मिनलमधील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात राहत होता. ज्यासंदर्भात अद्याप यंत्रणांना कोणतीही माहिती नव्हती. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?,” असा प्रश्न कुक काऊंटीच्या न्यायाधीश सुजाना ओर्टिज यांनी पोलिसांना विचारला.

नक्की वाचा >> भारतातील करोना लसीकरणात कंडोम बनवणारी कंपनी बजावणार महत्त्वाची भूमिका

असिस्टंट पब्लिक डिफेंडर असणाऱ्या कर्टनी स्मॉलवूड यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य सिंह लॉस एंजेलिसमधील एका उपनगरामध्ये राहतो. आदित्यचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय. आदित्य शिकागोला नक्की का आला होता यासंदर्भातील माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र विमानतळावरील प्रवेश बंदी असणाऱ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे घुसखोरी करणे आणि चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. जामीन मिळवण्यासाठी आदित्यला एक हजार डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. तसेच विमानतळावर आदित्यला तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्यास येऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

न्या. ओर्टिज यांनी आपल्या निकालामध्ये, “न्यायालयाने या खटल्यातील सर्व बाजू ऐकून घेतल्यावर घडलेली घटना आणि निर्माण झालेली परिस्थिती ही आश्चर्यात टाकणारी असल्याचे मानते. एवढ्या काळासाठी हे सारं घडत होतं पण कोणालाही ते समजलं नाही. विमानतळ हे प्रवाशांसाठी पूर्णपणे सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळेच अशा प्रकरणांमध्ये विमानतळावर राहणारी व्यक्ती ही समाजासाठी धोकादायक ठरु शकते,” असं मत व्यक्त केलं. शिकागोमधील विमानतळांची देखभाल करणाऱ्या सरकारी विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहो. मात्र यामध्ये संबंधित व्यक्ती विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण होईल असं काहीही करत नव्हती,” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya singh man found living in chicago airport for three months due to fear of covid scsg
First published on: 19-01-2021 at 08:59 IST