पीटीआय, नवी दिल्ली
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी गुरुवारपासून भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्र परिषदेत महिला पत्रकारांना सहभागी होण्यास मनाई करण्यात आल्यावरून वाद झाला असून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
मुत्ताकी यांच्या पत्र परिषदेत महिलांची अनुपस्थिती अस्वीकार्य आणि महिलांचा अपमान असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेदभावाविरुद्ध मौन बाळगल्याने महिला सक्षमीकरणावरील त्यांच्या घोषणांचा पोकळपणा उघड झाल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षांनी केला.
मोदीजी, जेव्हा तुम्ही महिला पत्रकारांना सार्वजनिक व्यासपीठावरून वगळण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही भारतातील प्रत्येक महिलेला सांगत आहात की तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहण्यास खूप कमकुवत आहात. आपल्या देशातील महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान सहभागाचा अधिकार आहे. अशा भेदभावासमोर तुमचे मौन महिला सक्षमीकरणाच्या तुमच्या घोषणांचा पोकळपणा उघड करते. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. जर महिलांच्या हक्कांचा तुमचा स्वीकार हा केवळ निवडणुकींमधील एक ढोंग नाही, तर आपल्या देशात, जो आपल्या महिलांना आपला कणा आणि अभिमान मानतो, हा अपमान कसा स्वीकारण्यात आला? – प्रियंका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस</p>
तालिबानने महिला पत्रकारांवर निर्बंध लादले आणि भारत सरकारने ते मान्य केले हे धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत ही दुर्देवी घटना घडली. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
तालिबानी मंत्र्याला त्यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्याची परवानगी देऊन सरकारने प्रत्येक भारतीय महिलेचा अपमान केला आहे. हा ढोंगी लोकांचा लज्जास्पद गट आहे. – महुआ मोईत्रा, खासदार, तृणमूल काँग्रेस</p>
महिला पत्रकारांना तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होऊ न देऊन भारताने आपल्या नैतिक आणि राजनैतिक प्रतिष्ठेशी तडजोड केली आहे. ही केवळ प्रक्रियात्मक चूक नाही तर समानता, माध्यम स्वातंत्र्य आणि लैंगिक न्यायासाठी भारताच्या दीर्घकालीन वचनबद्धतेची प्रतीकात्मक शरणागती आहे. – मनोज झा, खासदार, राजद
तालिबानच्या श्रद्धेमुळे पत्रकार परिषदेत कोणत्याही महिला पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. बामियान बुद्ध (जे तालिबानने नष्ट केले होते) पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर होते. भारत सरकारने ‘अफगाणिस्तान अमिरात’च्या संदेशाला दिलेली मान्यता विडंबनात्मक आहे. – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)