भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण चरण सिंह यांच्यावर संघातील सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. या मुलीने दिल्ली पोलीस आणि दंडाधिकारी या दोघांसमोर तक्रार दाखल केली होती. अल्पवयीन मुलीने लैंगिक छळाची तक्रार केल्याने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, दोन तक्रारी करणाऱ्या या अल्पवयीन मुलीने आता तक्रार मागे घेतली असल्याचे वृत्त समोर येत आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तक्रार मागे घेतल्याने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला धक्का लागला असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “१७ वर्षीय अल्पवयीन पीडितेने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत दंडाधिकार्‍यांसमोर नवीन जबाब नोंदवला आहे. हा जबाब न्यायालयासमोरील पुरावा मानला जाऊ शकतो. या जबाबाचा अर्थ असा होऊ शकतो की तक्रारदाराने केलेल्या आरोपांचा पाठपुरावा करणे किंवा न करणे हे न्यायालयावर अवलंबून आहे. १६४ अंतर्गत कोणत्या विधानाला प्राधान्य द्यायचे हे एक चाचणी ठरवेल.”

हेही वाचा >> कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतली? साक्षी मलिक खुलासा करत म्हणाली…

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा

दिल्ली पोलिसांकडे नोंदवलेल्या एफआयआरनुसार, “अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितलं होतं की, ते पूर्णपणे अस्वस्थ झाले आहेत. ते आता शांत राहू शकत नाहीत. आरोपीकडून होणाऱ्या लैंगिक छळामुळे तिला त्रास होत आहे.” १० मे रोजी अल्पवयीन मुलीने ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जबाब नोंदवला होता. एफआयआरनुसार, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या (पोस्को) कलम १० आणि आयपीसी कलम ३५४ (विनयभंग आणि जबरदस्ती), ३५४ ए (लैंगिक छळ), ३४५ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांमध्ये आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

कसा झाला होता अत्याचार?

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “मुलीने वयाच्या १६ व्या वर्षी झारखंडच्या रांची येथे नॅशनल गेम्समध्ये ज्युनिअर रेसलिंग चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. येथेच फोटो घेण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषणने मुलीला जवळ ओढलं होतं. तिला जवळ ओढल्यानंतर ब्रिजभूषणने तिच्या कंबरेखाली हात ठेवला होता. तसंच, तू मला सहकार्य कर, मग मी तुला सहकार्य करेन असंही ब्रिजभूषण पीडिला मुलीला म्हणाला होता.” एफआयआरमध्येही अशीच तक्रार नोंदवण्यात आली होती.

वरिष्ठ वकिल रेबेका जॉन म्हणाल्या की, मला आश्चर्य वाटतं. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला अटक करण्यास विलंब झाल्याने तक्रारदारावर दबाव येऊ शकतो. यामुळे संघर्ष दीर्घ आणि वेदनादायक असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 2 statements against him minor withdraws charges against wfi chief brij bhushan sgk
First published on: 06-06-2023 at 08:50 IST