Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून तिथे राजकीय धुसफूस सुरू आहे. कर्नाटकात सत्तांतर घडवून आणण्याकरता स्पर्धक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच, भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारी याद्यांमुळे काही नेते नाराज झाले आहेत. यातील काही नाराज नेत्यांनी दिल्लीदरबारी आपली कैफियत मांडली आहे, तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी थेट पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या मार्गाने निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. लक्ष्मण सावदी आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत, तिथूनच त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी आज कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बंगळुरूत भेटले. सिद्धरामय्या यांच्या घरी ही भेट झाली. या भेटीत लक्ष्मण सावदी यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर डी. के. शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सावदी यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की, “माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी आज सायंकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.” इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

हेही वाचा >> Karnataka : ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट कापले; भाजपा नेते म्हणाले, “उमेदवार कुणीही असो, पक्षाचे चिन्ह अन् मोदींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास”

“लक्ष्मण सावदी यांना भाजपामध्ये अपमानित झाल्यासारखे वाटले. सावदींसारख्या वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसमध्ये घेणं आमचं कर्तव्य आहे. आणखी दहापेक्षा जास्त विद्यमान आमदार काँग्रेसमध्ये येऊ इच्छितात. परंतु, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध नाही. लक्ष्मण सावदी लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते आहेत. तसंच, कर्नाटक भाजपामधील नंबर दोनचे अतिमहत्त्वाचे नेते आहेत,” असंही शिवकुमार म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने मंगळवारी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यावेळी लक्ष्मण सावदी यांना वगळण्यात आलं. अथानी मतदारसंघातून त्यांना तिकिट नाकारण्यात आल्याने त्यांनी तकडाफडकी निर्णय घेत पक्षाला रामराम ठोकला. तसंच, येत्या काळात आपण महत्त्वाची पावले उचलणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं होतं. त्यानुसार, त्यांनी आता काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >> अतीक आणि अशरफ यांच्या सुनावणी दरम्यान दुसऱ्या मजल्यावरून डोकावणारी बुरखाधारी महिला कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपासमोरील आव्हान वाढले?

लक्ष्मण सावदी अथानी विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदाराने त्यांचा पराभव केला. महत्त्वाचं म्हणजे ज्या आमदाराने सावदी यांचा पराभव केला त्याच महेश कुमाथहल्ली या उमेदवाराला भाजपाने यंदा उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे नाराज झालेले लक्ष्मण सावदी काँग्रेसचा हात हाती घेणार आहेत. लक्ष्मण सावदी भाजपाचे ज्येष्ठ आणि जाणते नेते होते. कर्नाटक भाजपात दोन क्रमाकांचे नेते होते. २०१२ मध्ये त्यांचं पॉर्न प्रकरण गाजल्यानंतरही ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकले. आपल्यावरील आरोपांना चोख प्रत्युत्तर देऊन त्यांनी आपलं स्थान पुन्हा एकदा निर्माण केलं होतं. अशा सशक्त नेत्याने काँग्रेसची साथ धरली आहे, तसंच इतर अनेक भाजपा आमदारही काँग्रेसमध्ये येऊ इच्छितात असा शिवकुमार यांचा दावा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपासमोरील आव्हाने वाढली असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे.