करोना काळात जिवाची बाजी लावणारे डॉक्टर आणि अ‍ॅलोपॅथीबाबत योगगुरु रामदेवबाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी योगगुरु रामदेवबाबा यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. दरम्यान, अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून योगगुरू रामदेव यांनी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांच्या वक्तव्याचा डॉक्टरांनी तीव्र विरोध केला होता. करोना काळात डॉक्टर घेत असलेले मेहनत संपुर्ण देश पाहत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. हर्ष वर्धन यांच्या पत्राला उत्तर देताना रामदेवबाबा म्हणाले की, “हे प्रकरण शांत करायचं आहे. डॉ. हर्ष वर्धन, आपले पत्र आले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.”

आपले अ‍ॅलोपॅथीबाबतचे विधान संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारे आहे. त्या वक्तव्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मनोबलास धक्का पोहोचू शकतो आणि करोनाविरोधातील आपली लढाई कमकुवत होऊ शकते, असे डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

रामदेवबाबा यांची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. तीत ‘‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले आहे. त्याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे.

काय म्हणाले रामदेवबाबा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशा विधानांचा समावेश असलेली एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.