पीटीआय, नवी दिल्ली : लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने मंगळवारी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. या सैनिकांना अल्पकाळासाठी भरती केले जाईल. संरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची घोषणा केली़  ‘‘अग्निपथ भरती योजना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण दलांना आणखी तरुण चेहरा प्राप्त होईल. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, असे सिंह यांनी सांगितल़े  या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील, असा विश्वास नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला़ 

  लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, की संरक्षण दलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करणे, हे अग्निपथ योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे संरक्षण दलांमध्ये तरुणाईची शक्ती आणि अनुभव यांचे संतुलन राखण्यास साहाय्य होईल. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लष्कराची आधीची कार्यशैली कायम राखली जाईल. या योजनेंतर्गत भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होतील. त्या अंतर्गत सैनिकांची भरती सुरुवातीला चार वर्षांच्या कालावधीसाठी असेल, परंतु त्यापैकी काही कायम ठेवण्यात येतील.

गेले दोन वर्षे या योजनेबाबत व्यापक विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर ही योजना जाहीर करण्यात आली. त्याचे आधीचे नाव ‘टूर ऑफ डय़ूटी’ होते. आधी ‘शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन’अंतर्गत दहा वर्षांसाठी भरती करण्यात येत होती. त्यात १४ वर्षांपर्यंत मुदतवाढ करण्यात येत होती. या योजनेमागे वेतन व निवृत्तिवेतनावर वाढलेला खर्च कमी करण्याचा हेतू आहे. २०२२-२३ मध्ये ५,२५,१६६ कोटींच्या संरक्षण दलासाठीच्या निधीच्या तरतुदींपैकी १,१९, ६९६ कोटी निवृत्तिवेतनापोटी खर्च झाले. महसुली खर्चासाठी २,३३००० कोटींची तरतूद केली होती. त्यात वेतनावरील खर्च व विविध आस्थापानांसाठीचा खर्च अंतर्भूत आहे.

मोबदला काय?

यंदा ४६,००० जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती केली जाईल़  ही भरती तीन महिन्यांतच सुरू होईल़  त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल़  पहिल्या वर्षी ‘अग्निवीरां’ना मासिक ३० हजार रुपये मोबदला मिळेल़  त्यांना दुसऱ्या वर्षी ३३,०००, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आह़े  प्रत्येक ‘अग्निवीरा’ला ११़ ७१ लाख सेवानिधी मिळणार असून, हे उत्पन्न करमुक्त असेल़  शिवाय, त्यांना सेवाकाळात ४८ लाखांचे विमाकवचही मिळेल़ 

दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती, केंद्राची घोषणा

नवी दिल्ली : विविध केंद्र सरकारी विभाग आणि मंत्रालयांनी आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावर सरकार सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी सेवेतील मनुष्यबळाचा आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाने ही नोकरभरतीची घोषणा केली़  त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केल़े  ‘‘आठ वर्षांपूर्वी युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले सरकार आता दहा लाख नोकऱ्यांबाबतही खोटे आश्वासन देत आहे’’ अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agneepath conscription contract method service defense forces appointment ysh
First published on: 15-06-2022 at 00:02 IST