AI Image Sparks Caste Tensions: एआय तंत्रज्ञान जसे मानवासाठी उपयुक्त आहे, तसे ते योग्य पद्धतीने न वापरल्यास घातकही ठरू शकते, असे संकेत अनेक तंत्रज्ञांनी दिले आहेत. याचीच अनुभूती मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात सध्या दिसत आहे. एआय फोटोमुळे येथील एका गावात जातीय तणाव निर्माण झाला. एका तरूणाला दुसऱ्या एका तरूणाचे पाय धुण्यास आणि ब्राह्मण समाजाची जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडले गेले. या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याची दखल घेतली असून घटनेची चौकशी सुरू केली आहे.

नेमके प्रकरण काय?

दमोह जिल्ह्यातील सतारिया गावातील रहिवासी पुरुषोत्तम कुशवाह या तरूणाने इन्स्टाग्रामवर एआय जनरेटेड इमेज शेअर केली होती. ज्यामध्ये एका तरूणाच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याचे दिसत होते. सदर व्यक्ती त्याच गावातील अनुज पांडे नावाचा तरूण असल्याचे सांगितले गेले. गावाने दारू विक्रीवर बंदी घालण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यानंतर पांडेने त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर कुशवाह याने सदर फोटो शेअर केला.

कुशवाह याने सदर फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत तो डिलीटही केला आणि माफी मागितली. परंतु मधल्या काळात सदर फोटो व्हायरल झाला आणि गावात संतापाची लाट उसळली.

फोटो व्हायरल झाल्यानंतर गावातील ब्राह्मण समुदायाने कुशवाहाला पकडून अनुज पांडेचे पाय धुण्यास भाग पाडले. तसेच त्याच्याकडून दिलगिरी वदवून घेतली. “मी ब्राह्मण समाजाची माफी मागतो. पुन्हा अशी चूक करणार नाही”, असे कुशवाह म्हणत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दमोहचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी म्हणाले, आम्ही व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असून एफआयआर नोंदविला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही बाजूच्या गटावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गावात पोलीस पथके गस्त घालत आहेत.

सदर प्रकरण घडण्याचे कारण काय?

सतारिया गावात दारूबंदी लागू झाल्यानंतर या प्रकाराला सुरुवात झाली. पांडेंने गावाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. दारूबंदी असूनही त्याने दारू विकल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने पांडेला गावात फिरून सार्वजनिकरित्या माफी मागण्याचे आदेश दिले. तसेच त्याला २,१०० रुपयांचा दंडही भरण्यास सांगितले.

यानंतर कुशवाह या तरूणाने पांडेची खिल्ली उडवणारी एआय जनरेटेड इमेज सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनंतर गावात तणाव निर्माण झाला. यानंतर पांडे आणि कुशवाह यांच्यात झालेल्या वैयक्तिक भांडणाचे रूपांतर जातीय संघर्षात झाले. सतारिया आणि आसपासच्या गावातील ब्राह्मण समुदायाचे लोक एकत्र आले. सदर फक्त पांडेच नाही तर संपूर्ण समाजाचा अपमान करणारी आहे, असा रोष समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.