Air India Flight Crashes Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेमध्ये २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. मात्र, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. याच विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. तसेच या विमानात असलेल्या सर्व क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

या विमान दुर्घटनेत १२ क्रू मेंबर्स होते. या क्रू मेंबर्समध्ये निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या एका पायलटचा समावेश होता. तसेच ११ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेली एक फ्लाइट अटेंडंट, तसेच एअर इंडियामध्ये नुकतेच रुजू झालेले दोन क्रू मेंबर्स आणि अनेक तरुणींसाठी प्रेरणा असलेली पनवेलची एक तरुण फ्लाइट अटेंडंटचाही समावेश होता. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पायलट सुमित सभरवाल

अहमदाबादवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच झालेल्या अपघात एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्स पैकी एक असलेले कॅप्टन सुमित सभरवाल हे होते. सुमित सभरवाल हे गेल्या काही वर्षांपासून पायलट म्हणून काम करत होते. सभरवाल हे त्यांच्या ९० वर्षीय वडिलांबरोबर पवईतील जलवायू विहारमध्ये राहत होते. ही घटना घडल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींच्या मते सभरवाल हे काही महिन्यांनी निवृत्त होणार होते. त्यानंतर ते त्यांच्या वृद्ध वडिलांबरोबर राहणार होते.

पायलट सुमित सभरवाल यांच्याबाबत बोलताना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, “ते खूप संयमी आणि शिस्तप्रिय होते. आम्ही त्यांना अनेकदा गणवेशात ये-जा करताना पाहायचो.” दरम्यान, सभरवाल यांच्या पाठिमागे आता त्यांची मोठी बहीण आहे, ती दिल्लीत राहते. त्यांचे दोन्ही मुलं व्यावसायिक वैमानिक आहेत. पायलट सुमित सभरवाल यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण पवईकरांना धक्का बसला आहे.

फ्लाइट अटेंडंट दीपक पाठक

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक बदलापूर येथील फ्लाइट अटेंडंट दीपक पाठक हे देखील होते. ११ वर्षांहून अधिक काळ एअरलाइन्समध्ये कामाचा त्यांना अनुभव होता. दीपक पाठक हे नेहमी फ्लाइट उड्डाण करण्याआधी घरी फोन करणं चुकवत नव्हते. असंच त्यांनी घटनेच्याआधीही घरी फोन केला होता. याबाबत कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, “त्याने नेहमीप्रमाणे आम्हाला फोन केला होता. पण आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तो फोन शेवटचा ठरेल.”

सायनीता चक्रवर्ती

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये ३५ वर्षीय सायनीता चक्रवर्ती यांचाही समावेश होता. एअर इंडियातील या अपघातग्रस्त विमानामधील असलेल्या क्रूपैकी या एक होत्या. सायनीता चक्रवर्ती या जुहू कोळीवाडा येथील रहिवासी होत्या. याआधी त्या गो एअरलाईन्समध्ये काम करत होत्या. मात्र, त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एअर इंडियामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या काही नातेवाईकांनी सांगितलं की, “त्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम केले होते.”

मैथिली मोरेश्वर पाटील

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात पनवेलमधील न्हावा गावातील २४ वर्षीय फ्लाइट अटेंडंट मैथिली मोरेश्वर पाटील यांचाही समावेश होता. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर मैथिली मोरेश्वर पाटील यांच्या घरी अनेक स्थानिक जमले होते. अनेकांनी मैथिली मोरेश्वर पाटील यांच्या घरी आठवणी मांडल्या. तिने तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाची अनेकांनी आठवण करून दिली. तिला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाल्यानंतर ती त्यांच्या न्हावा गावातील असंख्य तरुणींसाठी प्रेरणा होती, असं त्यांच्या काही नातेवाईकांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोशनी सोनघरे

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २७ वर्षीय रोशनी राजेंद्र सोनघरे हिचाही समावेश होता. विमानात असलेल्या क्रू मेंबर्सपैकी ही एक होती. डोंबिवलीतील राजाजी पथवरील माधवी बंगला परिसरातील रहिवासी असलेल्या सोनघरे यांचे पालक आणि भाऊ यांना ही बातमी समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. एअर इंडियामध्ये नुकतीच रुजू झालेली सोनघरे ही फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. एअर होस्टेस होणं हे तिचं स्वप्न होतं, असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं. ती डोंबिवली पूर्वेतील एका सोसायटीत तिच्या आईवडिलांबरोबर राहत होती. इंस्टाग्रामवर तिचे मोठे फॉलोअर्स होते.