पाकिस्तानचे पंतप्रधान रझा परवेज अश्रफ यांच्या उद्याच्या भारतभेटीत मिठाचा खडा पडला आहे. या दौऱ्यात शनिवारी अजमेर येथील प्रसिद्ध दग्र्यात जाऊन माथा टेकण्याचे अश्रफ यांनी ठरविले आहे, मात्र या दग्र्यात त्यांचे अधिकृत स्वागत केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका या दग्र्याचे मौलवी झैनुल अबेदीन अली खान यांनी घेतली आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांच्या केलेल्या निर्घृण हत्येचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या आमच्या दोन सैनिकांची पाकिस्तानी सैन्याने अतिशय क्रूरपणे हत्या केली. याशिवाय पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादात आमचे निष्पाप नागरिक बळी पडत आहेत. हे केवळ मानवाधिकारांचेच उल्लंघन नाही तर इस्लामलाही ते मान्य नाही. या परिस्थितीत आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे स्वागत केले तर हुतात्मा झालेल्या सैनिकांचा तो अवमान ठरेल, याच कारणामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने आपल्या वर्तनात बदल केला तरच उभय देशांतील संबंध सुधारतील, असे ते म्हणाले.