खासदार दानिश अली यांना बहुजन समाज पक्षाने कालच बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर आज पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीत मायावतींनी मोठी घोषणा केली आहे. बसपा नेते उदयवीर सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मायावतींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी काळात जेव्हा मी राहणार नाही, तेव्हा पक्षाची कमान आकाश आनंद याच्या हाती असेल, असे मायावती यांनी जाहीर केल्याचे उदयवीर सिंह यांनी सांगितले.
उदयवीर सिंह पुढे म्हणाले की, सध्या आकाश आनंद यांच्याकडे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्य वगळता इतर राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतही आकाश आनंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मायावती यांचा लहान भाऊ आनंद कुमार यांचा आकाश हा मुलगा आहे. सप्टेंबर २०१७ साली मायावती यांनी दोघांनाही पक्षात आणून त्यांची ओळख करून दिली होती.
हे वाचा >> ‘बसपा’मध्ये आकाश आनंदचा उदय; मायावतींचा भाचा आगामी निवडणुकांचा चेहरा
राजस्थानमधील पक्ष संघटनेत गेल्या काही काळापासून आकाश आनंद लक्ष घालत आहेत. पक्ष संघटनेची ताकद आणि पक्षाचा विस्तार चाचपडण्याचा प्रयत्न आनंद यांनी केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) त्यांनी अलवर (राजस्थान) येथे १३ किमी लांबीची पदयात्रादेखील काढली होती. तेव्हापासून आनंद मायावती यांचे राजकीय वारसदार असतील, असे बोलले जात होते. आकाश यांना बसपाचे राष्ट्रीय समन्वयक पद अधिकृतरित्या देण्यात आले आहे.
२८ वर्षीय आकाश आनंदने लंडनमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. २०१७ साली आपल्या वडिलांसह बसपात सक्रिय झाल्यानंतर आकाशकडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपा प्रमुख मायावती यांच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षाचा सोशल मीडिया चालविण्याची जबाबदारी आकाश आनंदने पार पाडली.
२०२२ साली हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मायावती यांच्या खालोखाल आकाश आनंदचे नाव लिहिले होते. वर नमूद केल्याप्रमाणे २०२३ मधील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही आकाश आनंदने महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.