रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. खनिज तेल तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. याच युद्धाच्या संदर्भाने नाटोच्या फौजांची रशियाच्या लष्कराशी चकमक झाल्यास जगभरात विध्वंस होईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. असे असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशिया, चीन या देशांना फटकारले आहे. विशेष म्हणजे त्यांनी पाकिस्तावही कठोर टीका केली असून पाकिस्तान हा देश जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक आहे, असे मत व्यक्त केले आहे. ते लॉस एंजेलिसमध्ये (कॅलिफोर्निया) एका कार्यक्रमात बोलत होते. जगातील महाशक्ती असलेल्या अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात धोकादायक देशांमधील एक देश असल्याचे म्हटल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> टोच्या फौजा रशियावर चालून आल्या तर जगभरात विध्वंस होईल”, व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर इशारा; सगळेच देश सतर्क!
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जो बायडेन यांनी पाकिस्तानवर थेट टीका केली आहे. “आपल्या देशाला काय हवे हे चीनचे अध्यक्ष क्षी जनिपिंग यांना चांगल्या प्रकारे समजते. मात्र सध्या त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. या समस्यांना आपण कसे तोंड द्यावे? रशियामध्ये सध्या जे सुरू आहे, त्या अनुषंगाने चीनमधील समस्यांना कसे सोडवावे, असा प्रश्न चीनला पडलेला आहे. यासोबतच पाकिस्तान हा सर्वांत धोकादायक देशांमधील एक देश आहे. कोणत्याही बांधिलकीशिवाय तसेच जबाबदारीशिवाय त्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत,” असे जो बायडेन म्हणाले.
हेही वाचा >> जी. एन. साईबाबा यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित, राज्य सरकारच्या याचिकेवर निर्णय
मागील काही दिवसांपासून पाकिस्तमधील शाहबाज शरीफ सरकार अमेरिकेसोबतचे आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे बायडेन यांनी वरील विधान केले आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. बायडेन यांनी चीन आणि रशियालाही लक्ष्य केले आहे.
