Amit Shah गुजरातच्या अहमदाबादमधून लंडनसाठी रवाना झालेल्या विमानाचा आज दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी अपघात झाला. ८०० फुटांच्या वर विमानाने उड्डाण केलं असताना ते विमान अपघातग्रस्त झालं. या घटनेत विमानात बसलेल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतची माहिती दिली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले?

गुजरात सरकार, केंद्र सरकार यांच्या मदतीने आमही मदत आणि बचावकार्य राबवत आहोत. या विमानात देशातले आणि परदेशातले असे २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यापैकी फक्त एक प्रवासी वाचला आहे. मी त्यांना भेटून आलो आहे. नेमकी मृत्यू संख्या किती ती डीएनए टेस्ट आणि ओळख पटल्यानंतरच कळू शकणार आहे. गुजरात सरकारने दुर्घटना घडताच सगळ्या विभागांना अलर्ट पाठवला होता. त्यानुसार तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. प्रचंड प्रमाणात उन होतं आणि विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं. त्यामुळे कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळी भेट दिली आहे. डीएनए सँपलची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. साधारण १ हजार डीएनए टेस्ट कराव्या लागतील आणि त्या गुजरातमध्येच होतील असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.

ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या प्रति माझ्या संवेदना

आज दुपारी एअर इंडियाचं विमान AI 171 याचा अपघात झाला. अनेक प्रवाशांचा यात मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळा देश दुःखात आहे. संपूर्ण देशाच्या संवेदना जी घटना घडली त्यात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रति आहेत. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. घटनेची माहिती मिळताच मी तातडीने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, नागरि उड्डाण मंत्री, गृहमंत्री यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केलं.

एअर इंडियाने अपघाताबाबत काय निवेदन दिलं?

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विमानात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी घटना काय?

अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय-१७१ उड्डाणानंतर तीन मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ कोसळलं अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व प्रवाशांच्या नातेवाईकांना एअर इंडियाकडून सहकार्य केलं जात आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करत आहे. तसेच या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरील प्रोफाइल फोटो हटवला आहे.