निवडणूक निकालाच्या भाकितावर ‘अंनिस’ची प्रश्नपत्रिका

लोकसभा निवडणूक निकालाचे अूचक भाकित वर्तविण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषांची  परीक्षा घेण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे. निवडणूक निकालासंबंधी त्यांना पाच प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याची अचूक उत्तरे देणाऱ्यांना रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे. फलज्योतिष हे शास्त्र असून त्या आधारावर भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषांनी हे आव्हान स्वीकारावे, असे आव्हान समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.

निकालांचे अचूक भाकित वर्तविण्याचे दावे ज्योतिषी करत असतात. त्यातून अंधश्रद्धेला अधिकच बळकटी मिळते. अशा प्रवृत्तीच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. मागील निवडणुकीतही ज्योतिषांना २१ लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

लोकप्रबोधनाचा हेतू ठेवून स्लोकसभा निवडणुकीचेही अचूक निकाल सांगा आणि २१ लाख रुपये मिळवा, असे आव्हान समितीने ज्योतिषांना दिले आहे. हे आव्हान स्वीकारणाऱ्या ज्योतिषांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाणार आहे. पाच मुख्य प्रश्न व उपश्नांची २५ गुणांची ही प्रश्नपत्रिता असेल. निवडणूक आयोगाने सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर  परीक्षक समितीच्या तपासणीनंतर ज्योतिषांनी वर्तविलेले निकाल जाहीर केले जातील. २५ पैकी किमान २२ गुण मिळविणारा  ज्योतिषी बक्षीसाठी पात्र ठरेल. या संदर्भात नाव नोंदणीसाठी ज्योतिषांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह डॉ. नितीन शिंदे यांच्याशी ९८६०४३८२०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ज्योतिष्यांसाठी प्रश्नावली

१ )लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत खालील पक्षांना मिळणाऱ्या एकूण जागा किती असतील ?  -पक्षांची नावे-बसप, भाजप, सप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, शिवसेना.

२) खालील उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानाच्या किती टक्के मते मिळतील?- उमेदवारांची नावे-नरेंद्र मोदी, कन्हैयाकुमार, राहुल गांधी, असदुद्दीन ओवेसी, अमित शहा, राजू शेट्टी, फारुख अब्दुल्ला

३) खालील मतदारसंघातून विजयी होणाऱ्या उमेदवारांचे नाव काय असेल ? -मतदारसंघाची नावे-उत्तर मुंबई, जम्मू, फैजाबाद, बेहरामपूर, विशाखापट्टणम, कानपूर, मोरादाबाद. याखेरीज आणखी प्रश्न विचारण्यात आले आहेत.