Air India Flight Cancelled: अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आज दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना रद्द करण्यात आलं आहे. आज सकाळी अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान रद्द झालं. त्यानंतर अमृतसरहून लंडनला जाणारं विमानही रद्द करण्यात आलं. आता दिल्लीहून पॅरिसला जाणारं एअर इंडियाचं विमान रद्द करण्यात आलं आहे. दिवसभरात एअर इंडियाची सात उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलायनरशी संबंधित होती.

एअर इंडियाच्या वतीने याबद्दल निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात म्हटलं की, एअर इंडियाच्या एआय१४३ विमानाची पूर्वतपासणी करण्यात आल्यानंतर त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, “१७ जून रोजी दिल्लीहून पॅरिसला जाणारं एआय-१४३ हे विमान रद्द करण्यात येत आहे. उ्डडाणापूर्वी अनिवार्य असलेली तपासणी केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आढळल्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल (CDG) विमानतळावर रात्रीच्या उड्डाणावर निर्बंध असल्यामुळे सदर विमान रद्द करण्यात येत आहे. आम्ही प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था करत आहोत. जर त्यांनी तिकीट रद्द केले, तर त्यांना पूर्ण पैसे परत दिले जातील किंवा त्यांची इच्छा असल्यास त्यांना दुसऱ्या विमानात सोय करून दिली जाईल.”

याशिवाय, आजचं उड्डाण रद्द झाल्यामुळं उद्या (१८ जून) पॅरिसहून दिल्लीला परतणारं एआय-१४२ हे विमानही रद्द करण्यात आल्याची घोषणा एअर इंडियानं केली आहे.

फक्त भारतातून बाहेर जाणाऱ्या नाही तर विदेशातून भारतात येणाऱ्या विमान सेवेंवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या AI180 या विमानाचं सोमवारी मध्यरात्री नियोजित वेळेत १२ वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग झालं. पण विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे कोलकात्याहून मुंबईच्या दिशेनं विमानाचं उड्डाण लांबलं. जवळपास चार तासांहून अधिक काळ विमानतळावरच थांबल्यानंतरही सदर तांत्रिक समस्या दुरूस्त न झाल्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं.

अहमदाबाद येथे घडलेल्या अपघातात २४२ पैकी २४१ प्रवाशी मृत्यूमुखी पडल्यानंतर एअर इंडियाकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळेच तांत्रिक तपासात काहीही अडचण जाणवल्यास त्याचा परिणाम विमानाच्या वेळापत्रकावर होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक गोंधळाबरोबरच हवामानाचाही फटका एअर इंडियाच्या सेवेला बसला आहे. अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामुळे दिल्ली आणि इतर ठिकाणच्या विमान सेवेवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर याबद्दल पोस्ट टाकली असून प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या विमानाची स्थिती पाहून घ्यावी, असे आवाहन केलं आहे.

दिवसभरात सात उड्डाणे रद्द

  • एआय९१५ – दिल्ली ते दुबाई (बी७८८ ड्रीमलायनर)
  • एआय१५३ – दिल्ली ते व्हिएन्ना (बी७८८ ड्रीमलायनर)
  • एआय१४३ – दिल्ली ते पॅरिस (बी७८८ ड्रीमलायनर)
  • एआय१५९ – अहमदाबाद ते लंडन (बी७८८ ड्रीमलायनर)
  • एआय१७० – लंडन ते अमृतसर (बी७८८ ड्रीमलायनर)
  • एआय१३३ – बंगळुरू ते लंडन (बी७८८ ड्रीमलायनर)
  • एआय१७९ – मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को (बी७७७ ड्रीमलायनर)