आयफोन, आयपॉड, आयपॅड या जगप्रसिद्ध उत्पादनांची निर्मिती करणाऱया अ‍ॅपल इंक कंपनीच्या नफ्यात गेल्या दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच घट झालीये. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात यंदा वाढ झाली असली, तरी नफ्यामध्ये मात्र घट झाली आहे. 
अमेरिकेतील चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. या तिमाहीमध्ये कंपनीला ९.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा नफा मिळाला असून, कंपनीने ४३.६ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीमध्ये कंपनीला ११.६ अब्ज डॉलरचा नफा झाला होता आणि ३९.२ अब्ज डॉलरचा महसूल कंपनीने मिळवला होता.
अ‍ॅपलच्या आयफोन आणि आयपॅड या उत्पादनांना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल कंपनीचे प्रमुख टीम कूक यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत. ग्राहकांच्य प्रतिसादामुळेच कंपनीच्या महसूलात वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.