Shivraj Singh Chouhan On BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. असं असतानाच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोहन भागवत यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माहितीनुसार ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. या बैठकीत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जातं. या भेटीनंतर शिवराज सिंह चौहान भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहात का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवराज सिंह चौहान यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. मी कधीही याचा विचार केलेला नाही असं म्हणत आपण शेतकऱ्यांची सेवा करू इच्छित असून माझं फक्त एकच ध्येय आहे. शेती उत्पादन कसं वाढवायचं अशी प्रतिक्रिया शिवराज सिंह चौहान यांनी दिली. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

शिवराज सिंह चौहान काय म्हणाले?

“मला एक गोष्ट सांगायची आहे. पंतप्रधान मोदी यांनी मला कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयांची जबाबदारी सोपवली आहे. सध्या शेती माझ्या शरीराच्या प्रत्येक नसानसात आहे आणि शेतकरी माझ्या श्वासात आहेत. माझं फक्त एकच ध्येय आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं, ग्रामीण भागांचा विकास कसा करायचा आणि अधिक लखपती दीदी कशा बनवायच्या हेच ध्येय आहे”, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांना पत्रकारांनी भाजपाच्या पुढील अध्यक्षाबद्दल विचारलं असता शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं की, “मी कधीही याचा विचार केलेला नाही आणि कोणीही मला सांगितलं नाही. मी याचा विचारही करू शकत नाही. मी कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री आहे. मी हे काम पूजा म्हणून करत आहे. शेतकऱ्यांची सेवा करणं ही माझ्यासाठी देवाची पूजा आहे आणि मी ही पूजा करत राहू इच्छितो.”