एपी, बँकॉक : म्यानमारमधील कचीन या मूळनिवासी अल्पसंख्य समुदायाच्या प्रमुख राजकीय संघटनेच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या लोकांवर तेथील लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० पेक्षा जास्त जण ठार झाल्याचा दावा ही संघटना तसेच मदत कार्यात सहभागी कार्यकर्त्यांनी सोमवारी केला. हा हल्ला रविवारी रात्री झाला.
म्यानमारमधील वाढत्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आणखी तीन दिवसांनी इंडोनेशियात होणार आहे. त्याआधी हा हल्ला झाला आहे. उत्तरीय कचीन राज्यातील कचीन स्वातंत्र्य संघटनेच्या वार्षिक मेळाव्यावर हा हल्ला झाला. यात ठार झालेल्यांत कार्यक्रमासाठी आलेले गायक, वादक यांचाही समावेश आहे. म्यानमारमधील लोकनियुक्त नेत्या आँग सान सू ची यांना गतवर्षी फेब्रुवारीत पदच्युत करून तेथील लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतरच्या काळात लष्कराच्या एकाच हल्ल्यात ठार झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. स्थानिक माध्यमांनी या हल्ल्याची छायाचित्रे प्रसारित केली असली तरी खात्रीशीर असा तपशील मात्र मिळू शकला नाही. म्यानमारचे लष्कर तसेच सरकारी वृत्तसंस्थेने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमारमधील कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्याच्या या धक्कादायक वृत्ताची आम्ही दखल घेतली आहे. निशस्त्र नागरिकांवर सुरक्षा दलांनी बळाचा अतिरेकी वापर करणे अत्यंत अयोग्य असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.




स्वायत्ततेची मागणी
म्यानमारमधील मूळनिवासी अल्पसंख्याक समुदायाकडून गेली अनेक दशके स्वायत्ततेची मागणी केली जात आहे. हा प्रश्न जुनाच आहे. पण, लष्कराच्या सत्ता हस्तगत केल्यानंतर त्याविरोधात सशस्त्र चळवळ सुरू झाल्यानंतर सरकारला होणाऱ्या विरोधाला आणखी धार चढली आहे. बंडखोर घटकांत कचीन हे प्रबळ मानले जातात. त्यांच्याकडे शस्त्रनिर्मितीची क्षमता आहे.