Rajnath Singh slam Congress MP Rahul Gandhi Over Armed Forces controlled by 10 percent claim : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण असल्याचे वक्तव्य केले आहे , यावरून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका केली. संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोप केला. यावेळी त्यांनी , “सैन्याला कोणताही धर्म किंवा जात नसते,” असेही स्पष्ट केले आहे.
उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान प्रचार सभेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. “राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता (Anarchy) निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर लष्कराला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि लष्करात विविध समाजांसाठी आरक्षणाची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील केली.
राजनाथ सिंह म्हणाले की, “आरक्षण असलं पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्ष देखील आहे… जेवढे गरीब आहेत त्या सर्वांना आरक्षण दिलं. पण लष्करात जाती-पातीच्या आधारावर? मला वाटतं की याची चर्चा देखील झाली नाही पाहिजे. आपल्या सैन्याच्या जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे ‘सैन्य धर्म’, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो.”
हे देशाच्या हितामध्ये नाही. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की किमान आपल्या लष्कराला राजकारणात ओढू नका. जेव्हा जेव्हा या देशासमोर कोणतेही संकट आले आहे, तेव्हा आपल्या सैनिकांनी शौर्य आणि पराक्रम दाखवून भारताची मान उंचावली आहे. जात-पंथ आणि धर्माच्या राजकारणाने आपल्या देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. आमचा विचार आहे की समाजाच्या सर्वच वर्गांची प्रगती झाली पाहिजे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुटुंब येथील जाहीर सभेत हे विधान केले, ज्यात त्यांनी असा दावा केला की, भारतीय सैन्य हे देशातील १० टक्के लोकांच्या नियंत्रणाखाली आहे. “बँकेचा सर्व पैसा त्यांना जातो, त्यांनाच सगळ्या नोकऱ्या मिळतात आणि नोकरशाहीतील बहुतांश पदांवरही त्यांचेच वर्चस्व आहे. ते सर्व काही नियंत्रित करतात… सैन्यावरही त्यांचेच नियंत्रण आहे. आणि ९० टक्के लोकसंख्या तुम्हाला कुठेच दिसणार नाही,” असे राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधींनी आरोप केला की, वंचित समाज, ज्यामध्ये दलित, महादलित, मागसवर्ग आणि अल्पसंख्यांकाची संख्या लोकसंख्येच्या ९० टक्के असूनही त्यांना कॉर्पोरेट्स, नोकरशाही, न्यायव्यवस्था आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळक नाही.
