करोना विषाणूच्या संसर्गावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून सध्या करोना लसीकडे पाहिलं जातंय. अशातच देशभरात करोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र, यात अनेकजण अजूनही करोना लस घेण्यास धजावत नाहीयेत. यामागे लसीविषयीच्या अफवा आणि गैरसमजही कारणीभूत आहेत. मात्र, बिहारमध्ये एका आजोबांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल ११ वेळा करोना लसीचे डोस घेतल्याचं समोर आलं आणि देशभरात त्यांची चर्चा झाली. आता याच ८४ वर्षीय आजोबांविरोधात अटक वॉरंट निघालं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? चला समजून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील उदकिशुनगंज उपविभागांतर्गत पुरैनी पोलीस स्टेशनच्या ओराई गावातील रहिवासी ब्रह्मदेव मंडल यांना करोना लसीचा तब्बल १२ वा डोस घेण्यासाठी आले असताना पकडण्यात आले. चौकशी केली असता या आजोबांनी स्वतःच आतापर्यंत ११ लसीचे डोस घेतल्याचं सांगितलं. ब्रम्हदेव मंडल यांनी लसीचे इतके डोस कसे घेतले हे शोधण्यासाठी आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणी मधेपुरा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल झालाय. त्यामुळेच या आजोबांविरोधात अटक वॉरंट निघालं आहे.

आता या आजोबांना लवकरच अटक केली जाईल. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना लगेच जामीनही मिळेल, असं जाणकार सांगत आहेत.

करोना लसीचे इतके डोस का घेतले?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लस घेणाऱ्या ब्रह्मदेव मंडल या आजोबांनी सांगितले की करोना लस घेतल्यानंतर त्यांना असलेल्या एका गंभीर आजाराचा त्रास कमी झाला. यानंतर आजोबांनी हा आजार बरा व्हावा म्हणून करोना लसीचे डोस घेण्याचा सपाटाच लावला. त्यांनी ११ डोस घेतले आणि १२ व्या डोससाठी पुन्हा लसीकरण केंद्रावर आले. यासाठी त्यांनी आपलं आधार कार्ड, मतदान कार्ड याचा वापर केला. मात्र, १२ व्या वेळी आजोबांचा हा प्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांचं बिंग फुटलं.

११ वेळा लस घेणारे आजोबा टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी

हे आजोबा टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी पहिला लसीचा डोस घेतला. त्यानंतर १३ फेब्रुवारी ते ३० डिसेंबर दरम्यान त्यांनी सार्वजनिक आरोग्य केंद्रात ११ डोस घेतले. त्‍यांनी लसीचे ठिकाण, तारीख आणि वेळ देखील लिहून ठेवली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आणि व्यवस्थेतील त्रुटी देखील उघड झाल्या आहेत.

हेही वाचा : बहुतांश आफ्रिकेतील देशांचा समावेश असलेल्या गरीब देशांना केवळ ०.६ टक्के लसी मिळाल्या : WHO

ऑफलाइन शिबिरांमध्ये लोक अशा प्रकारे फसवणूक करू शकतात, असा दावा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. ते म्हणाले, “आधार कार्ड आणि फोन नंबर शिबिरांमध्ये गोळा केले जातात आणि नंतर डेटाबेसमध्ये दिले जातात. अनेकदा कंप्युटरवरील डेटा आणि ऑफलाइन रजिस्टरमधील डेटा वेगळा असतो. अशा वेळी माहितीची पुनरावृत्ती झाल्याचे आढळल्यास ते नाकारले जातात. परंतु ते अपलोड होण्यापूर्वी लसीकरण झालेलं असतं.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest warrant against grandfather who take 11 corona vaccine jabs in bihar pbs
First published on: 09-01-2022 at 17:18 IST