Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपाने दिल्लीची सत्ता काबीज केल्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का बसला. एवढंच नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’च्या अनेक नेत्यांचा देखील पराभव झाला. त्यानंतर दिल्ली महानगरपालिकाही आम आदमी पक्षाच्या हातातून निसटली. तेथेही भाजपाची सत्ता स्थापन झाली. दरम्यान, यानंतर आता आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या १३ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या १३ नगरसेवकांनी ‘आप’चा राजीनामा दिल्यानंतर एक वेगळा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या बंडखोर नेत्यांमध्ये एमसीडीमधील ‘आप’चे सभागृह नेते मुकेश गोयल यांचाही समावेश असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी या नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत गोयल यांनी आदर्श नगरमधून ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. गेल्या महापालिका निवडणुकीच्या आधी हे नेते काँग्रेससोडून आम आदमी पक्षात आले होते. २५ वर्षे नगरसेवक म्हणून काम करणारे गोयल हे देखील २०२१ मध्ये काँग्रेसमधून आपमध्ये आले होते.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यानंतर काही दिवसांतच आम आदमी पक्षासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षात अंतर्गत कलह सुरु असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आपमधील कलह कमी करण्यासाठी ‘आप’ने मार्चमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय देखील घेतला होता. माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांची दिल्ली युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. तसेचमाजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पंजाबची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातच आता दिल्लीतील १३ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.