दिल्ली सरकारच्या कथित मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली असून केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना सुरुवातीला १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र १५ एप्रिल रोजी त्यांना ईडीने न्यायालयासमोर हजर केलं आणि चौकशीसाठी आणखी काही दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत त्यांच्या कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. केजरीवाल यांना मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी २१ मार्चच्या रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा जामीनही नाकारण्यात आला होता.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगात छळ होत असल्याचा आरोप आप नेत्यांनी केला आहे. तसेच केजरीवाल यांना त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकाऱ्यांना समोरासमोर भेटू दिलं जात नसल्याचा दावा आपने केला आहे. केजरीवाल यांना उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीज) त्रास आहे. तसेच तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजनदेखील झपाट्याने कमी होत असल्याचा दावा आप नेत्यांनी केला आहे. त्यांना औषधंदेखील दिली जात नसल्याचा आरोप आपने केला आहे.

दुसऱ्या बाजूला, ईडीनेही केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद केजरीवाल वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याद्वारे जामीन मिळवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत असा आरोप ईडीने केला आहे. केजरीवालांच्या डाएट आणि आरोग्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच त्यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे की, त्यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन दिलं जावं. केजरीवालांच्या या याचिकेवर आज (१९ एप्रिल) सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा >> “आम्हाला त्या मतदारसंघात…”, उमेदवाराचं नाव पाहून संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार; नेमकं प्रकरण काय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीने म्हटलं आहे की, “केजरीवाल तुरुंगात असे पदार्ध खातायत जे टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णासाठी धोकादायक आहेत. ते दररोज गोड चहा पित आहेत, मिठाई खात आहेत.” ईडीने केजरीवाल यांचा तुरुंगातील १७ दिवसांचा डाएट चार्टदेखील जारी केला आहे. दरम्यान, ईडीने केलेले सर्व आरोप केजरीवालांच्या वकिलांनी फेटाळून लावले आहेत. केजरीवालांच्या वकिलांनी म्हटलं आहे की, ईडी हे सगळे दावे केवळ माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी करत आहे.