मणिपूरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मौनातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने’ विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरु झाली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाची बाजू घेत ठाकरे गटातील खासदारांना इशारा दिला होता. यावर अरविंद सावंत यांनी संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी भाष्य केलं आहे.

श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याबद्दल बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “काहींनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. हिंदुत्वावर भाष्य करणाऱ्यांचा जन्म केव्हा झाला? हिंदुत्वात पळपुटे असू शकत नाहीत. पळपुटे म्हणल्यावर एवढी मिर्ची झोंबली की सर्वजण उठले. तुमच्यात हिंमत होती, तर समोर येऊन बोलायचं होतं. पण, हिंमत नसलेली ही माणसे आहेत.”

हेही वाचा : गद्दारी, हिंदुत्व अन् शिवसेना; श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत आणि नारायण राणे लोकसभेत भिडले

“माझे भाषण संपल्यावर नारायण राणे उभे राहिले. त्यांनी म्हटलं, ‘हा कधी शिवसेनेत आला.’ राणेंनी त्यांच्या आणि माझ्या जन्माची तारीख पाहून घ्यावी. मी जन्मापासून शिवसेनेत आहे. १९६८ साली मी शिवसेनेचा गटप्रमुख होतो. तुम्ही शिवसेना सोडली, तुमचा स्वाभिमान पक्ष लाचार झाला. नंतर तुम्ही काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यावरही तुमचा मुलगा काँग्रेसमध्येच होता. कुठहीही निती नसलेल्या माणसांनी बोलल्यावर आम्ही ऐकून घेणार नाही,” असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…”, मनसे नेत्याचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोकसभेत नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले. त्यामुळे लायकी वगैरे शब्द काढले. आपण कोण आहोत आणि कोणत्या स्थानावर बसलोय, हे काहींना कळत नाही,” अशी टीका अरविंद सावंत यांनी नारायण राणेंवर केली.