Asaduddin Owaisi on US strikes on Iran’s nuclear facilities : इस्रायलने शनिवारी रात्री इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हवाई हल्ला केला. पाठोपाठ अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ला करून इराण-इस्रायल युद्धात उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून या हल्ल्यांची माहिती दिली. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की अमेरिकेच्या शूर जवानांनी इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणुऊर्जा प्रकल्पांचा लक्ष्यभेद केला. हे तिन्ही हल्ले यशस्वी झाले आहेत. पाठोपाठ इराणने त्यांच्या अणऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही, असं म्हटलं आहे.

इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे या युद्धाची व्यापकता वाढली आहे. यामुळे जग मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आल्याची चर्चा आहे. दरम्यान, इराणवरील हल्ल्याचे आदेश देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबल पुरस्कार दिला जावा यासाठी पाकिस्तान काही दिवसांपूर्वी शिफारस करत होता. मात्र, अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे पाकिस्तानवर टीका होऊ लागली आहे. ट्रम्प यांचा उदोउदो करणाऱ्या पाकिस्तानवर मुस्लीम राष्ट्रे टीका करत आहेत.

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला असल्याची टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ओवेसी यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश झाल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याचा कोणी उदोउदो कसा काय करू शकतो असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ओवेसींची पाकिस्तानवर टीका

ओवेसी यांनी काही वेळापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “यासाठीच (अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यासाठी) पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली होती का? या हल्ल्यासाठीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख (असीम मुनीर) डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले व त्यांच्याबरोबर जेवले होते का? आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्याने संविधानाचं उल्लंघन केलं त्याच्यासाठी पाकिस्तान नोबेलची मागणी करत होता”

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जावा यासाठी शिफारस करत होता. ते नेमकं कशासाठी? ज्या माणसाने राष्ट्राध्यक्षपदी बसल्यानंतर त्याच्याच देशाच्या संविधानाचं उल्लंघन केलं, ज्याने संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला (घोषणापत्र) हरताळ फासला, ज्याने एनपीटीचं (Nuclear Non-Proliferation Treaty – अण्वस्त्र प्रसार प्रतिबंध करार) उल्लंघन केलं, त्या माणसाला शांततेचा नोबल पुरस्कार दिला जावा यासाठी पाकिस्तान वकिली करत होता. अशा माणसासाठी पाकिस्तान शिफारसी करत होता”.