एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर बुधवारी दुपारी रेल्वे बोर्डचे अध्यक्ष ए.के.मित्तल यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दुसरीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला होता. परंतु, मोदींनी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे.

 

गेल्या सात दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन रेल्वे अपघात झाले आहेत. बुधवारी पहाटे औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. ७० हून अधिक प्रवासी या अपघातात जखमी झाले. त्यापूर्वी मुजफ्फरनगरमध्ये खतौली येथे उत्कल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली होती. या अपघातात २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० प्रवासी जखमी झाले. खतौलीत झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अडचणी वाढल्या होत्या. सुरेश प्रभू यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. रेल्वे मंत्रालयावरील दबाव वाढत असतानाच कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला. या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

अपघातानंतर सुरेश प्रभूंनी उत्कल एक्स्प्रेसची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. त्यानंतर रेल्वेने मोठी कारवाई करत उत्तर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर.एन.कुलश्रेष्ठ आणि दिल्ली विभागाचे डीआरएम आर.एन.सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ए के मित्तल यांना मोदी सरकारने दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. २०१६ मध्येच मित्तल निवृत्त होणार होते. मात्र रेल्वे मंत्रालयाने मित्तल यांना दोन वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली होती. पंतप्रधान कार्यालयानेही मित्तल यांना मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील दाखवला होता.