वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
“पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनिर हा सुटाबुटातील ओसामा बिन लादेन आहे. नजीकच्या काळात अमेरिकेचे ‘सील’ पथक (विशेष कमांडो दल) पाकिस्तानमध्ये (पुन्हा) प्रवेश करून तेथील अण्वस्त्रे सुरक्षित करील. तसे केले नाही, त्याची किंमत न परवडणारी असेल,’’ अशी टीका पेंटागॉनमधील पश्चिम आशियातील घडामोडींचे निवृत्त विश्लेषक आणि अधिकारी मायकेल रुबिन यांनी केले आहे. पाकिस्तान एका अपयशी देशासारखा वागत असल्याचे ते म्हणाले.
‘‘पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर निम्म्या जगाला घेऊन आम्ही बुडू’’ असे प्रक्षोभक विधान मुनिर यांनी केले होते. त्यावर बोलताना रुबिन म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे वागणे स्वीकारार्ह नाही. मुनिर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून अण्वस्त्रांच्या बाबतीत केलेले विधान ‘इस्लामिक स्टेट’ आणि ओसामा बिन लादेनने केलेल्या वक्तव्यासारखे आहे. एक देश म्हणून पाकिस्तान जबाबदारी निभावू शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. फील्ड मार्शल यांनी केलेले वक्तव्य आम्ही ‘इस्लामिक स्टेट’कडून जे ऐकत आलो आहोत, त्याच्याशी मिळतेजुळते आहे. पाकिस्तानवर तातडीने राजनैतिक उपाय करणे गरजेचे असून, या देशाला दहशतवाद पुरस्कृत देश म्हणून जाहीर करावे. मुनिर यांना अमेरिकेचा व्हिसाही नाकारण्यात यावा. मुनिर यांच्या वक्तव्यानंतर त्यांना ३० मिनिटांच्या आतच तातडीने अमेरिकेबाहेर घालवून द्यायला हवे होते. ट्रम्प यांचा पाकिस्तानबरोबरील व्यवहार कदाचित बाह्य घटकांमुळे होत असेल.’’
‘आसिम मुनिर हा सुटाबुटातील ओसामा बिन लादेन आहे,’ असे नमूद करतानाच रुबिन यांनी पाकिस्तानची संभाव्य विभागणी, पाकिस्तानमधील अण्वस्त्रे वाचविण्यासाठी करावा लागेल असा लष्करी हस्तक्षेप यावरही भाष्य केले.
रुबिन यांची निरीक्षणे
– रशियातून ऊर्जाखरेदीवरून ट्रम्प यांचे भारताबरोबरील ताणतणाव आणि निर्बंध लादल्यामुळे काहीही फरक पडणार नाही.
– अमेरिकाच रशियातून सामरिक सामग्री खरेदी करते.
– विद्यमान प्रशासनाचा दृष्टिकोन बदलल्यानंतर भारत-अमेरिका संबंध सुधारतील. सध्या हे संबंध कसोटीच्या काळातून जात आहेत.