पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी दुपारी गोळीबार करण्यात आला आहे. ते एका मोर्चात सहभागी झाले होते, यावेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात इम्रान खान यांच्यावर उजव्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आपल्यावर हल्ला होणार आहे, याची माहिती आपल्याला एक दिवस आधीच समजली होती, असा गौप्यस्फोट इम्रान खान यांनी केला आहे. त्यांनी रुग्णालयात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान खान म्हणाले की, माझ्यावर हल्ला होणार आहे, याची एक दिवस आधीच मला माहिती मिळाली होती. माझ्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. मला मारण्याचं षडयंत्र आधीच रचलं होतं, असंही खान म्हणाले.

हेही वाचा- Video: “…म्हणून मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या”, हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितलं खरं कारण!

इम्रान खानवरील हल्ल्याचा कट गुजरातमध्ये रचला?

इम्रान खान यांनी पुढे सांगितलं की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील वझिराबाद येथे किंवा गुजरातमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला गेला. एका बंदिस्त खोलीत चार जणांनी हा कट रचला. याबाबतचा मी व्हिडीओ बनवला असून तो माझ्याकडे आहे. माझ्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर, हा व्हिडीओ प्रसारीत करण्यात यावा, अशा सूचना मी दिल्या आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. ‘इंडिया टुडे’नं पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’च्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं घडलं काय?

गुरुवारी दुपारच्या सुमारास पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफर अली खान चौकात इम्रान खान यांच्या पक्षाचा ‘हकीकी आझादी मोर्चा’ पोहोचला होता. हा मोर्चा मुख्य चौकात आल्यानंतर अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला आणि घटनास्थळी एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ सुरू झाली. या गोंधळात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केलं. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने पावलं उचलत गर्दीतून हल्लेखोराला हेरलं आणि अटक केली.