वायनाड: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयावर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कार्यालयातील खुच्या आणि अन्य सामानांची मोडतोड करण्यात आली. या प्रकरणी एसएफआयच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात शुक्रवारी एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या मोर्च्याच्या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या कार्यालयात घुसून सामानांची मोडतोड केली. किमान ८० ते १०० कार्यकर्ते असावेत, असे पोलिसांनी सांगितले असून त्यापैकी ८ जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.  एसएफआय ही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. काँग्रेसने या हल्ल्यानंतर माकपवर जोरदार टीका केली. ही घटना कायद्याचा भंग करणारी असून गुंडगिरीचे राज्य असल्याचे दिसून येते, असे केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सॅथिसन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी या घटनेचे निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला निंदनीय असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.